जीव वाचविण्यासाठी आजीबाईंचा सात तास पायी प्रवास | पुढारी

जीव वाचविण्यासाठी आजीबाईंचा सात तास पायी प्रवास

कीव :  रशिया-युक्रेन युद्धाने तेथील आबालवृद्ध अशा सर्वांनाच मोठे कठीण दिवस आले आहेत. लेकीला सुरक्षितस्थळी पाठवत असताना ओक्साबोक्सी रडत असलेला पिता, आई-वडिलांना सोडून एकटाच एक हजार किलोमीटरचा प्रवास करून स्लोव्हाकियाला गेलेला अकरा वर्षांचा मुलगा अशी चित्रे हृदयस्पर्शीच आहेत. आता एका आजीबाईंची कहाणीही समोर आली आहे. 80 वर्षांच्या या आजीबाईंनी थकल्या देहाने जीव वाचविण्यासाठी सात तास चालून हंगेरीची सीमा ओलांडली!

संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार युद्ध सुरू झाल्यापासून पाच लाखांहून अधिक नागरिकांनी युक्रेन सोडले आहे. यामध्ये चोमानिन गावातील 80 वर्षांच्या आजी पिरोस्का बक्सा यांचाही समावेश आहे. या आजीबाई जीव वाचविण्यासाठी सुमारे सात तास सतत चालत राहिल्या होत्या. पिरोस्का यांचा जन्म 1942 मध्ये झाला. या वृद्ध महिलेने आपली कन्या आणि चौदा वर्षांच्या नातीसह हंगेरीची सीमा ओलांडली.

सुरुवातीला त्या आपला देश, घर सोडण्यास तयार नव्हत्या. मात्र, कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी त्यांनी होकार दिला. अतिशय जड अंतःकरणाने पायीच त्या गाव, देश सोडून निघाल्या. एका वृत्तानुसार, आतापर्यंत 70 हजारांहून अधिक शरणार्थींनी शेजारच्या हंगेरी देशात आश्रय घेतला आहे.

Back to top button