‘या’ तीन गोष्टींमुळे वाढू शकते आयुष्य! | पुढारी

‘या’ तीन गोष्टींमुळे वाढू शकते आयुष्य!

वॉशिंग्टन : आपण आरोग्यसंपन्न असावे, दीर्घायुष्यी व्हावे अशी सर्वांचीच इच्छा असते. त्यासाठी काय करता येईल याबाबतही लोक उत्सुक असतात. आता अमेरिकेतील डॉ. मायकल ग्रेगर यांनी म्हटले आहे की, दीर्घायुष्यी बनण्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये पोषक आहार, धूम—पान न करणे आणि रोज 21 मिनिटे व्यायाम करणे यांचा समावेश होतो!

‘सीडीसी’च्या सहा वर्षांच्या संशोधनानुसार जे लोक आपल्या जीवनशैलीत या तीन गोष्टींचा अंतर्भाव करतात त्यांचा अकालीच मृत्यू होण्याचा धोका 82 टक्क्यांपर्यंत घटतो. डॉ. ग्रेगर यांच्या म्हणण्यानुसार अधिक तेलकट, मसालेदार अन्न आणि जंक फूडला रामराम ठोकणे गरजेचे आहे. आहारात अधिकाधिक फळे व भाज्यांचा समावेश असावा. शरीर ऑक्सिडाइज होऊ लागले की, माणूस लवकर म्हातारा आणि रोगग्रस्त होऊ लागतो. मात्र अँटीऑक्सीडंटस्युक्त आहार घेतल्याने या प्रक्रियेला धीमे करता येते. मांसाच्या तुलनेत फळे आणि भाज्यांमध्ये 64 पट अधिक अँटीऑक्सिडंटस् असतात.

त्यामुळे आहारात मांसाच्या तुलनेत फळे व भाज्यांचे प्रमाण अधिक असावे. शिकागो युनिव्हर्सिटीच्या संशोधनात आढळले आहे की, धूम—पान आणि वाढत्या वयाच्या खुणांमध्ये जवळचा संबंध आहे. स्मोकिंगमुळे स्त्री-पुरुषांमधील डीएनएची हानी होत असते. आहार जरी चांगला असला तरी या वाईट सवयीमुळे आयुष्याचा र्‍हास होतो. डॉ. ग्रेगरी यांच्या म्हणण्यानुसार सतत बसून राहणेही धूम—पानाइतकेच हानीकारक आहे. दिवसातून किमान 21 मिनिटे व्यायाम करणे गरजेचे आहे.

Back to top button