मधुमेहाच्या ४३ टक्के रुग्णांना समजत नाही चव! संशोधनातील माहिती
नवी दिल्ली : कानपूरच्या जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजच्या एका संशोधनातून असे दिसून आले आहे की मधुमेहाच्या 43 टक्के रुग्णांना चव समजणे कठीण होते. 'लाईफस्टाईल सिंड्रोम' आणि वृद्धापकाळातील मधुमेह असलेल्या 43.30 टक्के रुग्णांमध्ये हा स्वाद विकार असल्याचे दिसून आले आहे.
एखाद्या पदार्थाची चव गोड आहे की फिकी, कडू आहे की आंबट हे ओळखणे अशा रुग्णांना कठीण होते. चवीचा प्रकार आणि तिची तीवता या दोन्ही बाबींचे त्यांच्या जिभेला आकलन होत नसल्याचे समोर आले. मधुमेहाचा परिणाम केवळ मूत्रपिंड, हृदय, यकृत आणि डोळ्यांवर होतो हा गैरसमजही या अभ्यासाने दूर केला आहे. मधुमेह असलेल्या जवळपास निम्म्या रुग्णांना गोड चव ओळखता येत नाही. त्यांना खूप गोड असलेला पदार्थ थोडासाच गोड किंवा कमी गोड असलेला पदार्थ खूप गोड असल्याचेही जाणवते. तसेच आंबट, खारट आणि कडू चवही ओळखणे कठीण होते.
या पाहणीसाठी 60 रुग्णांचा त्यांच्या लेखी संमतीनंतर समावेश करण्यात आला. एका वर्षासाठी केस स्टडी ग्रुपमध्ये विभागून त्यांची पाहणी करण्यात आली. हा प्रकार 'ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी'मुळे होणारे 'केमिकल टेस्ट डिस्फंक्शन' असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यामध्येही गोड चव ओळखता येण्यात सर्वाधिक समस्या असल्याचे दिसून आले.