कोलेस्टेरॉल घटवण्यासाठी ‘हा’ आहार उपयुक्त | पुढारी

कोलेस्टेरॉल घटवण्यासाठी ‘हा’ आहार उपयुक्त

नवी दिल्ली :  हार्टअ‍ॅटॅक किंवा हृदयविकारासाठी रक्तवाहिन्यांमध्ये साचलेले कोलेस्टेरॉल जबाबदार असते. हल्ली अगदी तरुण वयातही कोलेस्टेरॉलची, ब्लॉकेजेसची समस्या दिसून येत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशिष्ट आहार उपयुक्त ठरतो असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

आहारामध्ये काही पदार्थांचा समावेश केल्यावर कोलेस्टेरॉलचा स्तर घटवण्यास मदत मिळते. यामध्ये ओटस्चा समावेश आहे. ओटस्मध्ये विद्राव्य फायबर, प्रोटिन आणि शर्करा असते. फायबरचे प्रमाण यामध्ये अधिक असल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते आणि हृदयाचे स्नायू मजबूत बनतात. अनेक लोक चवीसाठी राजमा खात असतात; पण तो कोलेस्टेरॉलच्या समस्येवरही गुणकारी आहे. खराब कोलेस्टेरॉलला कमी करण्यासाठी राजमा आणि डाळी उपयुक्त ठरतात. मासे हा सुद्धा यासाठी चांगला पर्याय आहे. माशांमध्ये ‘ओमेगा-3’ हे फॅटी अ‍ॅसिड असते.

अक्रोड आणि जवसामध्येही हे फॅटी अ‍ॅसिड असते. ते एक उत्तम अँटी ऑक्सिडंट असते तसेच रक्तातील बीटा-अ‍ॅमिलॉईड प्रोटिनचा स्तरही कमी करते. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी हे पदार्थ उपयुक्त ठरतात. मूठभर अक्रोड खाल्ल्यावर चात तासांतच त्याचे चांगले परिणाम समोर येऊ शकतात. अक्रोडमुळे कोलेस्टेरॉल कमी होतेच, शिवाय रक्तवाहिन्या अधिक लवचिक बनतात.

बदामाच्या सेवनानेही रक्तसंचार अधिक सुरळीत होण्यास मदत मिळते व त्यामुळे हृदयावर अधिक दाब येत नाही. ऑलिव्ह ऑईल तसेच सूर्यफुलाचे तेलही कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. हिरव्या भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, फायबर आणि खनिजे असतात व त्याही याकामी उपयुक्त ठरतात.

Back to top button