

नवी दिल्ली ः वनस्पती अचल असल्या तरी त्यांनाही संवेदना असतात असे आपल्याच जगदीशचंद्र बसू यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवले होते. लाजाळूसारखी वनस्पती असो किंवा घटपर्णीसारख्या कीटकभक्षी वनस्पती, या सर्व पशू-पक्ष्यांप्रमाणेच प्रतिक्रिया दर्शवत असतात. अशाच एका वनस्पतीचा व्हिडीओ आता सोशल मीडियात आला आहे.
वनाधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये या झाडाला स्पर्श करताच त्याच्या फळ किंवा शेंगेसारख्या भागातून बियांची 'फायरिंग' सुरू होते. जणू काही हे झाड चिडून क्षेपणास्त्र डागत आहे असेच पाहणार्यास वाटावे!
सध्या रशिया-युक्रेन युद्धाचे वार्तांकन टी.व्ही.वर पाहणार्या लोकांना ही वनस्पती अशीच योद्धा वाटावी यामध्ये नवल नाही! तोफगोळ्यांचा मारा, बंदुकीचा गोळीबार आणि क्षेपणास्त्रांचा मारा या सर्वांची आठवण करून देणारी वनस्पती आहे. या वनस्पतीचे नाव 'वूड सोरेल' असे आहे. बदामाच्या आकाराची पाने असलेले हे झाड नाजूक दिसत असले तरी स्वसंरक्षणासाठी असे तत्पर असते.
एक व्यक्ती काठीने या झाडाच्या शेंगांना हलवल्यावर यामधून बियांची अशी 'फायरिंग' सुरू होते. एकापाठोपाठ एक अशा या बिया 'फट् फट्' असा आवाज करीत बाहेर पडू लागतात. हे झाड विशेषतः दक्षिण आफ्रिका, ब—ाझील, मेक्सिकोमध्ये आढळते. त्याचे बीज असे उडून 4 मीटर अंतरापर्यंतही जाऊ शकतात. संग्रहित तणाव ऊर्जेच्या सहाय्याने या बियांचा असा 'ब्लास्ट' होतो.