नवी दिल्ली : डॉक्टर म्हणजे देवाचे दुसरे रूप असे म्हटले जाते. कधी कधी मृत्यूच्या दाढेतूनही डॉक्टर रुग्णाला वाचवतात. याचा नुकताच प्रत्यय आला. जगात असे पहिल्यांदाच घडले आहे की, शस्त्रक्रियेच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या दोन्ही हातांचे प्रत्यारोपण करण्यात आले.
आईसलँडमधील 'कोपावोगर' गावात राहणार्या 48 वर्षीय फेलिक्स ग्रेटर्सन याच्यावर शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी त्याला नवे जीवन दिले. फेलिक्सला एका व्यक्तीने आपले दोन्ही हात दान केले होते आणि याच हातांचे डॉक्टरांनी प्रत्यारोपण केले. ही जगातील पहिली शस्त्रक्रिया ठरली. 'द स्ट्रेट टाईम्स'च्या माहितीनुसार 12 जानेवारी 1998 रोजी फेलिक्स हा काम करत असताना अचानक त्याला विजेचा शॉक बसला आणि त्याचेे दोन्ही हात होरपळले. फेलिक्स तीन महिन्यांपर्यंत कोमात होता. यादरम्यान डॉक्टरांनी निकामी झालेले दोन्ही हात काढून टाकले. याशिवाय लिव्हरचेही प्रत्यारोपन केले.
2007 मध्ये फेलिक्सने आईलँडमधील प्रोफेसर डॉ. जीन मायकेल डुबरमर्ड यांच्यासोबत हातांच्या प्रत्यारोपणासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर फेलिक्सने शस्त्रक्रियेसाठी पैसा गोळा करण्यासाठी एक मोहीम सुरू केली. शेवटी अपघात घडल्याच्या 23 वर्षांनंतर जानेवारी 2021 मध्ये फेलिक्सवर डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. 15 तास चाललेल्या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून दोन्ही हातांचे व एका खाद्यांचेही प्रत्यारोपण करण्यात आले. आता ते दोन्ही हात वापरू शकत आहेत.