इस्लामाबाद : जगभरातून अनेकवेळा 'युफो' म्हणजेच 'उडत्या तबकड्या' पाहिल्याचे दावे करण्यात आले आहेत. अनेकांनी तर अपहरण करणार्या एलियन्स म्हणजेच परग्रहवासीयांच्या कहाण्याही सांगितलेल्या आहेत. मात्र, विज्ञानाने म्हणजेच वैज्ञानिकांनी आजपर्यंत परग्रहवासी किंवा त्यांची अंतराळयाने यांची कधीही पुष्टी केलेली नाही. आता पाकिस्तानात 'युफो' दिसल्याचा दावा करण्यात आला असून राजधानी इस्लामाबादच्या आसमंतातील या कथित 'युफो'चा एक व्हिडीओही प्रसिद्ध झाला आहे.
या व्हिडीओमध्ये एक रहस्यमय उडती वस्तू दिसून येते. 'युफो हंटर्स' या वस्तूला परग्रहवासीयांचे यान म्हणत आहेत. बर्मिंघमच्या अर्सलान वारराइचो यांनी सांगितले की त्यांनी सलग दोन तास आकाशात ही रहस्यमय त्रिकोणी वस्तू पाहिली. ती एखाद्या काळ्या धातूपासून बनवलेली असावी असे दिसून येत होते. त्यांनी सांगितले, ही वस्तू नेमकी काय होती हे मला माहिती नाही. मी या अज्ञात वस्तूचे वेगवेगळ्या वेळी सुमारे बारा मिनिटांचे व्हिडीओ बनवले. तिची अनेक छायाचित्रेही टिपली आणि सुमारे दोन तास तिचे निरीक्षण केले. उघड्या डोळ्यांनी पाहिल्यावर ती एखाद्या काळ्या दगडासारखी दिसत होती. तिचा आकार त्रिकोणी होता व वरच्या बाजूला उभट भाग होता. या वस्तूमधून कोणताही प्रकाश येत नव्हता किंवा ती चमकतही नव्हती. हा पक्षी नव्हता की ड्रोनही नव्हता. मी स्वतः ड्रोन उडवतो, त्यामुळे याविषयीची मला चांगली माहिती आहे.