न्यूयॉर्क : चालण्याचा व्यायाम ठरतो तन-मनासाठी लाभदायक | पुढारी

न्यूयॉर्क : चालण्याचा व्यायाम ठरतो तन-मनासाठी लाभदायक

न्यूयॉर्क :

चालण्या-फिरण्याचा व्यायाम हा सर्व व्यायाम प्रकारांपैकी एक उत्तम प्रकार असल्याचे अनेक तज्ज्ञ सांगत असतात. अनेक संशोधनांमधून असे दिसून आले आहे की चालण्याच्या व्यायामामुळे आपल्याला शारीरिक तसेच मानसिक लाभही होतो. यामुळे मनाला शांती मिळतेच शिवाय संवाद कौशल्यातही सुधारणा होते.

तज्ज्ञांच्या मते, चालणे हे एक ‘ब्रेन बूस्टर’ आहे. मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी त्याचा मोठा लाभ होतो. विस्मरणाच्या आजारांचा धोका यामुळे कमी होतो आणि स्मरणशक्‍ती सुधारते. व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीमधील एका संशोधनानुसार चालण्याच्या व्यायामामुळे वृद्ध लोकांमध्ये डिमेन्शिया आणि अल्झायमरसारखे विस्मरणाच्या समस्येशी संबंधित आजार होण्याचा धोका घटतो. चालण्यामुळे लठ्ठपणा, उच्च रक्‍तदाब आणि कोलेस्टेरॉल कमी होते. तसेच मधुमेह, कर्करोग आणि हृदयविकार दूर राहतात. हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील संशोधनानुसार आठवड्यातून केवळ अडीच तास चालण्यानेही हृदयविकाराचा धोका 30 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.
दिवसातून काही मिनिटे चालल्याने आपला मूड चांगला होऊ शकतो आणि एंग्झायटी कमी होऊ शकते. निसर्गरम्य ठिकाणी वॉकिंग केल्यावर त्याचा अधिक चांगला परिणाम होतो. चालल्यामुळे स्नायू आणि हाडेही बळकट होतात. त्यांच्यावरील ताण कमी होतो. आर्थरायटिस फाऊंडेशननुसार 50 ते 75 वर्षांच्या महिलांनी जर रोज काही मिनिटे चालण्याचा व्यायाम केला तर झोप न येण्याची समस्याही उद्भवत नाही.

 

Back to top button