विटेइतक्या आकाराच्या ओपल रत्नाची विक्री | पुढारी

विटेइतक्या आकाराच्या ओपल रत्नाची विक्री

वॉशिंग्टन : रत्नांना नेहमीच चांगली किंमत मिळत असते, मात्र अशा रत्नांची गुणवत्ता आणि आकार अधिक असेल तर त्यांना मिळणारी किंमतही तशीच थक्क करणारी असते. आता एखाद्या छोट्या विटेइतक्या आकाराच्या ओपल रत्नालाही अशीच मोठी किंमत मिळाली आहे. अत्यंत चांगल्या गुणवत्तेच्या या रत्नाला एका लिलावात 1,25,000 डॉलर्स म्हणजेच सुमारे 93 लाख रुपयांची किंमत मिळाली.

अमेरिकेत अलास्कामध्ये या रत्नाचा लिलाव करण्यात आला. ‘अलास्का प्रीमियर ऑक्शन्स अँड एप्रॅसल्स’ या लिलाव केंद्राने त्याचा लिलाव केला. ‘अमेरिकस ऑस्ट्रालिस’ असे संबोधल्या जाणार्‍या या ओपलचे वजन 11,800 कॅरेटपेक्षा अधिक आहे. या ओपलचा इतिहास मोठा आहे. अलीकडेच ते एन्कूरेजच्या उत्तरेकडील बिग लेकमध्ये असलेल्या एका घरातील लिननच्या कपाटात ठेवले होते. फ्रेड वोन बांट नावाच्या माणसाजवळ हे रत्न होते जो अलास्कामध्ये सोन्यासाठी खनन करतो आणि त्याच्या कुटुंबाचा रत्नांचा व्यापार आहे.

या कुटुंबाकडे हे रत्न 1950 पासून होते. फ्रेडच्या आजोबांनी ते जॉन अल्टमॅन नावाच्या एका ऑस्ट्रेलियन ओपल डीलरकडून खरेदी केले होते. आता ते कपाटातून काढून जगासमोर ठेवणे गरजेचे आहे असे त्याच्या वडिलांना वाटले. त्यामुळे त्यांनी या रत्नाचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. आता त्याला मिळालेल्या या किमतीमुळे ते खूश झाले आहेत.

 

Back to top button