पाच हजार वर्षांपूर्वीची कानाची शस्त्रक्रिया

पाच हजार वर्षांपूर्वीची कानाची शस्त्रक्रिया

न्यूयॉर्क : शल्यचिकित्सा किंवा शस्त्रक्रिया ही काही आधुनिक जगाची देणगी नाही. प्राचीन काळीही शस्त्रक्रिया केल्या जात असत. आपल्याकडे तर प्लास्टिक सर्जरीही होत होती. सुश्रुत संहितासारख्या प्राचीन ग्रंथांमधून अशा प्राचीन काळातील शस्त्रक्रियांची माहिती मिळते. जगात अन्यही अनेक ठिकाणी असे पुरावे मिळालेले आहेत. आता स्पेनच्या एका मकबर्‍यात 5300 वर्षांपूर्वीची एक अशी कवटी सापडली आहे जिच्या अभ्यासावरून दिसून आले की या व्यक्तीच्या कानावर शस्त्रक्रिया झाली होती!

या व्यक्तीच्या कानाच्या आसपास कवटीत अनेक छेद दिलेले आढळून आले. कानाची वेदना दूर करण्यासाठी कानाच्या आसपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. स्पॅनिश संशोधकांनी म्हटले आहे की 'मास्टोइडेक्टोमीकडे निर्देश करणारा हा पुरावा आहे. या प्रागैतिहासिक काळातील व्यक्तीला ओटिटिस मीडिया आणि मास्टोइडायडिसमुळे वेदना होत असाव्यात. ही वेदना दूर करण्यासाठी अशी शस्त्रक्रिया केली गेली असावी. ही व्यक्ती म्हणजे एक मध्यमवयाची महिला होती.

नवपाषाण युगातील या महिलेवरील ही शस्त्रक्रिया तत्कालीन शल्यचिकित्सेचे पुरावे देते. 'डोलमेन डी. एल. पेंडन' नावाच्या मकबर्‍यामध्ये ही कवटी सापडली होती. हा मकबरा बर्गोसमध्ये आहे. 2016 मध्ये वेलाडोलिड विद्यापीठाच्या संशोधकांनी शंभर अन्य लोकांच्या अवशेषांबरोबरच ही कवटीही शोधली होती. कानावरील वाढता दबाव दूर करण्यासाठी या महिलेवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती असे दिसून आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news