

न्यूयॉर्क : समुद्रात निळा देवमासा हा पृथ्वीच्या पाठीवरील सर्वात मोठा, लांब जीव राहतो असेच आपल्याला वाटते. मात्र, समुद्रातच त्याच्यापेक्षाही अधिक लांबीचा आणि जगातील सर्वाधिक लांबीचा जीव राहतो याची अनेकांना कल्पना नसेल. 2020 मध्ये संशोधकांना प्रथमच या जीवाचा छडा लागला. ऑस्ट्रेलियाच्या किनार्यापासून काही अंतरावर खोल समुद्रात हा तब्बल 150 फूट लांबीचा जीव आढळून आला. एखाद्या नाजूक दोरीसारखा दिसणार्या या जीवाचे 'सिफोनोफोर' असे नाव आहे.
खरे तर हा जीव अनेक जीवांपासून बनलेला असतो. या प्रजातीमधील प्रत्येक सदस्य 'झोईडस्' नावाच्या छोट्या जीवांपासून बनतो. ते एकमेकांना जोडून अशी दोरीसारखी लांबलच लांब कॉलनीच बनलेली असते. प्रवाळरांगा जशा बनतात तसाच हा प्रकार आहे. मात्र, हे समुद्रतळाशी जोडलेले नसतात तर पाण्यात तरंगत असतात. या अनोख्या जीवाचा अतिशय उशिराच शोध लागला. त्यामुळे आजही महाकाय आकाराच्या अनेक जीवांची विज्ञानाला माहिती नसावी असे संशोधकांना वाटते.
पृथ्वीवरील जीवसृष्टीचा अद्यापही अभ्यास सुरूच आहे व नवनव्या प्रजाती त्यामधून समोर येत असतात. नजीकच्या काही दशकांमध्ये माणसाने शोधलेल्या काही मोठ्या आकाराच्या सजीवांमध्ये या सिफोनोफोरचा समावेश होतो. हे जीव समुद्राच्या पृष्ठभागापासून 2300 ते 3280 फूट खाली आढळतात.