मेंदूतील चिपच्या एलन मस्क यांच्या प्रकल्पाला झटका
वॉशिंग्टन : मानवाच्या मेंदूत चिप बसवून त्याच्या विचारांवर नियंत्रण ठेवण्याच्या 'न्यूरालिंक प्रोजेक्ट' ला मोठाच झटका बसल्याचे समोर आले आहे. 'टेस्ला' आणि 'स्पेस एक्स'सारख्या कंपन्यांचे मालक असलेल्या एलन मस्क या अब्जाधीश उद्योगपतींची ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे.
एका अमेरिकन वृत्तपत्राने म्हटले आहे की ज्या 23 माकडांमध्ये 'न्यूरालिंक चिप' चाचणीसाठी बसवण्यात आली होती, त्यापैकी सुमारे 15 माकडांचा मृत्यू झाला आहे. या माकडांच्या मेंदूत कॅलिफोर्निया डेव्हिस युनिव्हर्सिटीत 2017 ते 2020 या काळात चिप बसवण्यात आली होती.
प्राण्यांच्या हक्कांसाठी लढणार्या फिजिशियन्स कमेटी फॉर रिस्पॉन्सिबल मेडिसिन ग्रुपने 700 पेक्षा अधिक पानांची कागदपत्रे व अन्य दस्तावेजांचा अभ्यास केला. त्यामधून असे दिसून आले की ज्या माकडांमध्ये चिप लावण्यात आली होती त्यांचे आरोग्य बिघडले. या माकडांच्या कवट्यांमध्ये छिद्र पाडून ही चिप बसवण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये रक्तातून संसर्ग (ब्लड इन्फेक्शन) झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. एक माकड सतत उलटी करीत होते व त्यामध्येच ते दगावले.
ऑटोप्सी रिपोर्टमध्ये म्हटले होते की या माकडाचे ब्रेन हॅमरेज झाले होते. न्यूरालिंक प्रोजेक्टची 2016 मध्ये सुरुवात करण्यात आली होती. लोकांमधील मेंदू व मज्जारज्जूंमधील गंभीर दुखापतींवरील उपचार हा त्यामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले होते.
लोकांना इंटरनेटशी कनेक्ट करण्याबरोबरच डिप्रेशन आणि अन्य मानसिक समस्यांवरील उपचारासाठीही ते प्रभावी ठरेल असे सांगण्यात आले होते. याचवर्षी माणसावरही त्याचा चाचण्या सुरू करण्यात येणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, आता या प्रकल्पाचे भविष्य अंधारात सापडले आहे.

