पेंग्विन दाखवतात हवामान बदलाची लक्षणे | पुढारी

पेंग्विन दाखवतात हवामान बदलाची लक्षणे

न्यूयॉर्क : जागतिक तापमानवाढीचे अनेक परिणाम जगभर दिसून येत आहेत. हवामानात बदल घडत असल्याची लक्षणे संशोधक पेंग्विन पक्ष्यांच्या वर्तनावरूनही ओळखत असतात. दक्षिण धृव म्हणजेच अंटार्क्टिकावरील पेंग्विन यासाठी संशोधकांना मदत करतात.

अंटार्क्टिकाच्या दुर्गम परिसरांमध्ये पोहोचणे मानवाला नेहमीच कठीण असते. मात्र, अन्य प्रजातींच्या तुलनेत पेंग्विनला ट्रॅक करणे अतिशय सोपे असते. सफेद बर्फावर काळ्या रंगामुळे पेंग्विन दूरवरूनही दिसून येतात. हे पक्षी बहुतांशी झुंडीतच राहतात आणि त्यांची गणतीही सहजपणे करता येऊ शकते. पेंग्विनची विष्ठाही बर्फावर सहजपणे ट्रॅक केली जाऊ शकते. न्यूयॉर्कमधील स्टोनी बृक विद्यापीठातील पर्यावरणतज्ज्ञ बोरोविज यांनी सांगितले की एका कॉलनीत किती पेंग्विन आहेत हे समजून घेण्यासाठी आम्ही पेंग्विनच्या घरट्यांची गणती करीत आहोत. तसेच नवजात पेंग्विनचीही आम्ही गणती करतो.

या माध्यमातून आम्हाला समजते की तेथील नैसर्गिक परिस्थिती कशी आहे. हवामान बदलामुळे हे पक्षी आपल्या अधिवासांमध्ये बदल करीत असल्याचे आम्हाला दिसून आले आहे. हा ट्रेंड आम्हाला अनेक झुंडींबाबत दिसून आला. पेंग्विनना अधिक थंड परिसरात जाण्यासाठी भाग पडत आहे. एडली पेंग्विन हे पक्षी समुद्रातील बर्फाजवळ राहतात. असा बर्फ घटत चालला असल्याने त्यांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. अर्थात गेल्या दशकभराच्या काळात वेडेल समुद्राच्या आसपास एडली कॉलनी अजूनही स्थिर आहे.

हेही वाचा

Back to top button