जगातील पहिला थ्री-डी प्रिंटेड स्टील ब्रीज!

जगातील पहिला थ्री-डी प्रिंटेड स्टील ब्रीज!

अ‍ॅम्स्टरडॅम ः नेदरलँडची राजधानी अ‍ॅम्स्टरडॅममध्ये जगातील पहिला थ्री-डी प्रिंटेड स्टील ब्रीज बनवण्यात आला आहे. त्याच्या डिझाईनपासून निर्मितीपर्यंतचे काम 'रोबो'ने केले आहे. 4500 किलो स्टीलपासून बनवलेला हा पूल अ‍ॅम्स्टरडॅममधील सर्वात जुन्या कालव्यावर बसवण्यात आला आहे.

नेदरलँडमधील 'एमएक्स थ्री-डी' या कंपनीने हा पूल तयार केला आहे. 15 जुलैला या पुलाचे उद्घाटन झाले असून 18 जुलैपासून तो सर्वसामान्य लोकांसाठी खुला करण्यात आला. बारा मीटर लांबीच्या या पुलाची निर्मिती चार रोबोंनी केली असून त्यासाठी सहा महिन्यांचा काळ लागला. त्यानंतर हा पूल नावेतून आणण्यात आला व तो क्रेनच्या मदतीने कालव्यावर बसवण्यात आला.

या पुलाशी संबंधित सर्व डाटा कॉम्प्युटरमध्ये फीड करून ठेवला जाईल जेणेकरून भविष्यात अशा पद्धतीचा पूल बनवण्यासाठी मदत मिळेल. कंपनीने या स्टील ब्रीजला 'एमएक्स 3 डी' असे नाव दिले आहे.

या पुलाच्या विविध चाचण्या यशस्वी ठरलेल्या आहेत. तो किती लोकांचा भार सहन करू शकतो, तापमान घटले किंवा वाढले तर त्याच्यावर कोणता परिणाम होतो आणि तो किती मजबूत आहे या निकषांवर आधारित या चाचण्या होत्या.

या पुलामध्ये एक डझनपेक्षा अधिक सेन्सर लावलेले आहेत. त्यांच्या मदतीने पुलाच्या मजबुतीशी संबंधित सर्व माहिती मिळालेली आहे व त्यानंतरच तो सर्वसामान्य लोकांसाठी खुला करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news