पाच हजार वैशिष्ट्यपूर्ण बाह्यग्रहांचा लागला शोध | पुढारी

पाच हजार वैशिष्ट्यपूर्ण बाह्यग्रहांचा लागला शोध

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने गेल्या चार वर्षांच्या काळात आपल्या सौरमालिकेबाहेरील सुमारे पाच हजार बाह्यग्रह शोधले आहेत. ट्रान्सिटिंग एक्झोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाईटच्या (टेस) मदतीने हे संशोधन करण्यात आले. या पाच हजार ग्रहांना ‘टेस ऑब्जेक्टस् ऑफ इंटरेस्ट’ असे नाव देण्यात आले आहे. आता या ग्रहांपैकी काही ग्रहांची निवड करून तिथे काय आहे याचे तपशीलवार संशोधन केले जाईल.

संशोधक मिशेल कुनीमोतो यांनी सांगितले की ‘टेस’ने 27 जानेवारीपर्यंत 2400 अशा ग्रहांची निवड केली होती. अशा ग्रहांचा शोध लावणे हे तुलनेने सोपे आहे; पण त्यांच्याबाबत तपशीलवार अध्ययन करणे कठीण आहे. ‘टेस’ला दोन वर्षांसाठी लाँच करण्यात आले होते. त्यानंतर त्याचा कालावधी जुलै 2020 पर्यंत वाढवण्यात आला होता. आता वैज्ञानिकांना आशा आहे की ही मोहीम 2025 पर्यंत सुरू राहील.

अंतराळात एखादा ग्रह किंवा विशिष्ट प्रकाश एक महिनाभर पाहिल्यावर ‘टेस’ याबाबत गोळा केलेल्या डेटाची माहिती कंट्रोल रूमकडे पाठवते. त्यावरून हा ग्रह व त्याच्या आसपास एखादा तारा आहे की नाही हे समजू शकते. जीवसृष्टीला अनुकूल अशा बाह्यग्रहांचा शोध यामधून घेतला जात असतो.

Back to top button