‘तिने’ बाळाला दिले विचित्र नाव! | पुढारी

‘तिने’ बाळाला दिले विचित्र नाव!

लंडन : ‘नावात काय आहे?’ असे शेक्सपिअर त्याच्या नाटकातून म्हणून गेला असला तरी नाममहात्म्य काही कमी होत नाही. खरे तर ही दुनियाच नाम-रूपांची आहे! त्यामुळे एखादे बाळ जन्माला आले की त्याचे नाव काय ठेवायचे याबाबत घरोघरी काथ्याकूट सुरू असतो. एखादे छानसं, अर्थपूर्ण नाव निवडून बाळाला दिलं जातं आणि ते त्याला आयुष्यभर चिकटून राहतं. विशेषतः बाळाला दिल्या जाणार्‍या नावाकडे आईचे चांगलंच लक्ष असतं. मात्र, एका आईने आपल्या बाळाला इतके विचित्र नाव दिले आहे की अनेकांनी तिच्यावर टीका केली.

एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका व्यक्तीने याबाबतची माहिती देऊन ती जगजाहीर केली आहे. या व्यक्तीची सहकारी असलेल्या या महिलेने नुकतेच एका कन्येला जन्म दिला आहे. तिने कुणाशीही चर्चा न करता आपल्या गोंडस लेकीला चक्क ‘स्ट्रॉबेरी रेन’ म्हणजेच ‘स्ट्रॉबेरीचा पाऊस’ असे नाव दिले. हे नाव एखाद्या शाम्पूच्या बाटलीसारखे वाटत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. आईने असे नाव ठेवण्यापूर्वी किमान एकदा तरी सर्वांशी बोलून घेणे गरजेचे होते असे या माणसाचे म्हणणे आहे.

यापूर्वी इंग्लंडच्या प्लेमाऊथ येथे राहणारी एक महिलाही बाळाला दिलेल्या नावामुळे चर्चेत आली होती. तिने आपल्या बाळाचे नाव ‘ल्यूसिफर’ असे ठेवले होते. हे सैतानाचे एक नाव आहे! एखादी आई आपल्या बाळाला असे नाव कसे देऊ शकते असा प्रश्न अनेकांना पडला.

Back to top button