हवामान बदल यामुळे घटू शकते माणसाची उंची | पुढारी

हवामान बदल यामुळे घटू शकते माणसाची उंची

लंडन ः हवामान बदल यामुळे अनेक विपरित परिणाम निसर्गात दिसून येत आहेत. आता संशोधकांनी म्हटले आहे की हवामान बदलामुळे माणसाची उंची घटू शकते तसेच मेंदूचा आकारही छोटा होऊ शकतो. गेल्या लाखो वर्षांच्या काळात हवामान बदलाचा परिणाम मानवी उंचीवर होत आलेला आहे. त्याचा थेट संबंध तापमानाशी आहे. केम्बि—ज आणि टबिजेन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबतचा दावा केला आहे.

जागतिक तापमानवाढ हा सध्या जगाच्याच चिंतेचा विषय बनलेला आहे. तापमानवाढीमुळे समुद्राच्या स्तरात वाढ होऊन किनारपट्टीवरील शहरे नष्ट होण्याचाही धोका आहे. दरवर्षी होत असलेल्या या तापमानवृद्धीच्या पार्श्वभूमीवर संशोधकांनी केलेले हे संशोधन इशारा देणारेच आहे.

या संशोधनासाठी त्यांनी जगभरातील मानवांचे तीनशेपेक्षाही अधिक जीवाश्म अभ्यासले. त्यांचे शरीर आणि मेंदूच्या आकाराची तपासणी केली. त्यामधून असे दिसून आले की या जीवाश्माशी संबंधित प्रत्येक मानवाने हवामान बदलाचे दुष्परिणाम झेलले आहेत.

आफ्रिकेत मानवाची प्रजाती ‘होमो’ तीन लाख वर्षांपूर्वी विकसित झाली असे मानले जाते. मात्र, ती त्याच्याही पूर्वीपासूनच आहे. होमो इरेक्टस् म्हणजे पाठीचा कणा ताठ ठेवून चालणारा माणूस, होमो हॅबिलिस म्हणजे हाताचा कुशलतेने वापर करू शकणारा माणूस यांच्यापासून पुढे होमो सेपियन्स हे आधुनिक मानवाचे पूर्वज विकसित झाले. त्याचवेळी निएंडरथलसारख्या अन्यही काही मानव प्रजाती अस्तित्वात आल्या होत्या.

मानवी विकासाचा क्रम पाहिला तर त्याच्या शरीराचा आणि मेंदूचा आकार वाढत गेल्याचे दिसून येते. केम्बि—ज युनिव्हर्सिटीच्या प्रा. अँड्रिया मेनिका यांनी सांगितले की लाखो वर्षांपासून शरीराच्या आकारात होणार्‍या बदलामध्ये तापमानाचेही मोठे योगदान राहिलेले आहे. त्याचप्रमाणे हवामान बदलाचाही यावर परिणाम होत असतो.

Back to top button