कोलेस्टेरॉल घटवणारे औषध कमी करते कोरोनाचा धोका | पुढारी

कोलेस्टेरॉल घटवणारे औषध कमी करते कोरोनाचा धोका

वॉशिंग्टन ः कोलेस्टेरॉल घटवणारे औषध ‘स्टेटिन्स’ कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूचा धोका 41 टक्क्यांपर्यंत कमी करते, असा दावा अमेरिकन संशोधकांनी केला आहे. नॅशनल अमेरिकन रजिस्ट्रीच्या आकडेवारीतून ही बाब स्पष्टही झाली आहे.

सॅन दियागोमधील या संशोधकांनी म्हटले आहे की आम्ही संशोधनात अशा रुग्णांचा डेटा समाविष्ट केला जे कोरोना होण्यापूर्वी स्टेटिन्स औषध घेत होते. जे लोक हे औषध घेत नव्हते अशा लोकांनाही यामध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यावरून असे दिसून आले की हे औषध रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा धोका कमी करते. कोलेस्टेरॉल घटवण्यासाठीचे ‘स्टेटिन्स’ हे औषध गोळ्यांच्या स्वरूपात असते.

कोलेस्टेरॉल हे दोन प्रकारचे असते. एक ‘गुड’ म्हणजे शरीराला हितावह असणारे व दुसरे म्हणजे ‘बॅड’, हानिकारक. हे औषध शरीराला हानिकारक असलेल्या कोलेस्टेरॉलचा स्तर कमी करते. बॅड कोलेस्टेरॉलचा स्तर वाढला की हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

संशोधकांनी म्हटले आहे की हे औषध कोलेस्टेरॉलला नियंत्रित करून शरीरात सूज येण्यापासून रोखते. त्याचे हेच वैशिष्ट्य कोरोनाच्या रुग्णांसाठीही लाभदायक ठरते. कोव्हिडच्या रुग्णांना आतून सूज घटल्यावर मृत्यूचा धोका कमी होतो.

सॅनदियागोच्या कार्डिओव्हॅस्क्युलर इन्टेन्सिव केअरचे संचालक लोरी डॅनियल यांनी सांगितले, कोरोनाशी लढण्यासाठी हे औषध परिणामकारक आहे. त्याचे आणखी एक कारण म्हणजे ‘अँजियोटेन्सिन-कन्वर्टिंग एन्झाईम-21’. जे रुग्ण आधीच स्टेटिन्स घेत होते.

त्यांच्यामध्ये कोरोनाचे संक्रमण गंभीर होण्याचा धोका 50 टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले. काही रुग्णांमध्ये या औषधाचे साईड इफेक्टस्ही दिसतात. त्यामध्ये डायरिया, डोकेदुखी व उलटी अशा त्रासाचा समावेश होतो.

Back to top button