हवेत वीस मिनिटांमध्येच 90 टक्के नष्ट होतो कोरोना विषाणू | पुढारी

हवेत वीस मिनिटांमध्येच 90 टक्के नष्ट होतो कोरोना विषाणू

लंडन: जगभर पुन्हा एकदा कोरोना (virus) महामारीने हाहाकार माजवलेला आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्‍वभूमीवर आता एक दिलासादायक वृत्त समोर आले आहे. इंग्लंडच्या ब्रिस्टल युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांनी म्हटले आहे की हवेच्या संपर्कात येताच सुरुवातीच्या पाच सेकंदांमध्येच विषाणू (virus)आपली निम्मी ताकद हरवतो. तसेच वीस मिनिटांच्या आतच कोरोना विषाणू 90 टक्के कमजोर होतो. हवेत आर्द्रता आणि कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी असल्याने हे घडते.

संशोधकांनी म्हटले आहे की हवा तरल असते व तिच्यामध्ये वेगवेगळे कण असतात. ते कालौघात वातावरणात फैलावत जातात. कोरोना विषाणूही हवेबरोबर फैलावण्यात सक्षम असतो. ज्यावेळी एखादी संक्रमित व्यक्‍ती खोकते किंवा शिंकते त्यावेळी जर आपण त्याच्या जवळच राहून श्‍वास घेत असू तर हे विषाणू आपल्या शरीरातही जाऊ शकतात. मात्र, हवा विषाणूच्या कणांना सुकवते.

तसेच हवेत कार्बन डायऑक्साईडची कमी असल्याने विषाणूचा ‘पीएच’ स्तर वाढतो. त्यामुळे काही मिनिटांनंतर विषाणू संक्रमण फैलावण्याची आपली क्षमता गमावतो. आर्द्रता आणि कार्बन डायऑक्साईडचे अधिक प्रमाण असलेल्या वातावरणात तो अधिक काळ तग धरून राहतो असा या वैज्ञानिकांचा दावा आहे. या दोन्ही गोष्टी आपल्या फुफ्फुसांमध्ये असल्याने तो सहजपणे आपले शरीर सोडत नाही. स्टीम रूम, शॉवर रूम यासारख्या ठिकाणी त्याची ताकद अधिक काळ राहू शकते. सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे व शारीरिक अंतर ठेवणे हे गरजेचेच आहे.

Back to top button