प्राचीन काळातील ‘मेगालोडन’ माशाचे आजही अस्तित्व? | पुढारी

प्राचीन काळातील ‘मेगालोडन’ माशाचे आजही अस्तित्व?

वॉशिंग्टन : समुद्र वैज्ञानिक सध्या एका अजब कोड्याचे उत्तर शोधू लागले आहेत. प्रागैतिहासिक काळातील ‘मेगालोडन’ या सागरी दैत्यच असावा अशा माशाच्या अस्तित्वाबाबतचे हे कोडे आहे. हा मासा पुन्हा अस्तित्वात आला आहे की काय याची शंका या वैज्ञानिकांना भेडसावत आहे. एका ग्रेट व्हाईट शार्कच्या शरीरावरील दातांच्या खुणा पाहून वैज्ञानिकांना या शार्क भक्षक अशा विक्राळ माशाची आठवण झाली आहे!

गेल्या काही दिवसांपूर्वी या शार्क माशाच्या शरीरावर अशा दातांच्या खुणा आढळून आल्या होत्या. मेक्सिकोच्या खाडीत प्रसिद्ध छायाचित्रकार जलील नजाफोव्ह यांनी या शार्कचे छायाचित्र टिपले होते. या शार्कवर असा हल्‍ला कुणी केला असावा ही चर्चा त्यानंतर सुरू झाली.

स्वतः जलील यांनी सांगितले की मी माझ्या आयुष्यात असा प्रकार पाहिलेला नसल्याने स्वतःच आश्‍चर्यचकीत झालो होतो. पुरातत्त्व संशोधकांनी एका जीवाश्माच्या आधारे म्हटले आहे की या दातांच्या खुणा एका प्रागैतिहासिक काळातील प्राण्याच्या असू शकतात. एखाद्या सामान्य शार्कच्या दातांपेक्षा हे दात अधिक मोठे आहेत. ‘मेगालोडन’ असे या माशाचे नाव होते.

हे मेगालोडन मासे कोणत्याही शार्कपेक्षा आकाराने मोठे आणि आक्रमक होते. ‘द ब्लू’चे प्रमुख डॉ. गुट्रिज यांनी म्हटले आहे की मादीसाठी झालेल्या झुंजीत हा हल्‍ला झालेला नसावा. याचे कारण म्हणजे माशाच्या शरीरावरील घाव बरे होत आले आहेत. मादीसाठी झुंज असती तर अधिक गंभीर घाव बनले असते. या दातांचा आकार पाहता एखाद्या अन्य प्रजातीच्या शार्कने त्याच्यावर हल्‍ला केला असावा.

Back to top button