

लंडन : ब्रिटनमध्ये संशोधकांनी मिडलँड परिसरात तब्बल 18 कोटी वर्षांपूर्वीच्या 'सागरी ड्रॅगन' चा सांगाडा शोधून काढला आहे. ब्रिटनच्या इतिहासातील मोठ्या जीवाश्म संशोधनामध्ये या शोधाचा समावेश केला जात आहे. 'इचथ्योसॉर' या मीनसरीसृपच्या शोधामुळे ब्रिटिश संशोधक अतिशय खूश आहेत. हा सागरी ड्रॅगन एखाद्या डॉल्फिनसारखा दिसत असे. मात्र, त्याची लांबी तब्बल 30 फूट होती. त्याची कवटीच 1 टन वजनाची आहे.
हे एक संपूर्ण आणि अतिशय विशाल आकाराचे जीवाश्म आहे. खरे तर त्याचा शोध फेब्रुवारी 2021 मध्येच जोड डेव्हीस यांनी लावला होता. त्याची माहिती आता प्रसिद्ध करण्यात आली आहे. रूटलँडच्या पाण्याजवळ सापडलेला हा सी ड्रॅगन सुमारे 82 फूट लांबीचाही असू शकतो. या इचथ्योसॉरने 'सी ड्रॅगन' असे म्हटले जाते याचे कारण म्हणजे त्यांचे दात आणि डोळे अतिशय मोठ्या आकाराचे होते. सर्वात पहिल्या इचथ्योसॉरचा शोध 19 व्या शतकात जीवाश्म वैज्ञानिक मेरी अन्नीइंग यांनी लावला होता.
या जलचराबाबत अध्ययन करणार्या डॉ. डीन लोमॅक्स यांनी सांगितले की ब्रिटनमध्ये इचथ्योसॉरचे अनेक जीवाश्म सापडले आहेत. त्यापैकी हा सर्वात मोठ्या आकाराचा सांगाडा आहे. हा खरोखरच एक अतिशय महत्त्वाचा शोध आहे. सुमारे 25 कोटी वर्षांपूर्वी जगात इचथ्योसॉर अस्तित्वात आले होते आणि 9 कोटी वर्षांपूर्वी ते लुप्त झाले. सध्याचा इंग्लंडचा परिसर आणि अटलांटिक महासागरात ते सर्वत्र अस्तित्वात होते.