

वॉशिंग्टन : अमेरिकन वैज्ञानिकांनी अटलांटिक महासागरात पृष्ठभागापासून 2.7 किलोमीटर खोलीवर समुद्रतळाशी अज्ञात आणि रहस्यमय अशी छिद्रे शोधली आहेत. एका सरळ रेषेत विशिष्ट अंतर ठेवून ही छिद्रे बनवण्यात आली आहेत. वैज्ञानिकांनी फेसबुकवर याबाबतची माहिती शेअर करून ही छिद्रे कशाची आहेत याची माहिती जगाकडे मागितली आहे.
अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फिरिक अॅडमिनिस्ट्रेशनने (नोआ) आपल्या फेसबुक पेजवरून या छिद्रांची छायाचित्रे शेअर केली आहेत. 'नोआ'ने म्हटले आहे की फेसबुक वापरणार्या लोकांनी ही छिद्रे कशाची आहेत हे सांगावे. शनिवारी समुद्रतळाशी बुडी मारल्यावर अशी अनेक छिद्रे आढळून आली. अशी छिद्रे यापूर्वीही या परिसरात आढळली होती. मात्र, त्यांचा स्रोत अद्यापही जगासाठी रहस्य बनून राहिला आहे. एखादा माणूस जसे छिद्र बनवेल तशीच ही छिद्रे आहेत.
एखाद्या हत्याराने तिथे खोदले असावे असे दिसते. 'नोवा'च्या पाणबुड्यांनी तीनवेळा या छिद्रांचे निरीक्षण केले आणि त्यांचा नकाशा बनवला. त्यांनी यासाठी रिमोट कंट्रोलने चालणार्या एका वाहनाचाही वापर केला. हे फोटो पाहून अनेकांनी अनेक मते व्यक्त केली आहेत. एखाद्या कंपनीचे हे काम असेल, जमिनीतून गोड्या पाण्याचे उमाळे आले असतील, एखाद्या विशिष्ट खेकड्याचे काम असेल इथंपासून ते परग्रहवासीयांचा हात असेल इथंपर्यंत्त अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया यूजर्सनी दिल्या आहेत.