

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli Ruled Out : भारत इंग्लंड कसोटी मालिकेशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. विराट कोहलीने मालिकेतील पहिल्या 2 कसोटींमधून आपले नाव मागे घेतले आहे. विराटने 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतून माघार घेण्यामागचे कारण वैयक्तिक असल्याचे सांगितले जात आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. पहिला कसोटी सामना हैदराबादमध्ये तर मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणमच्या विझाग येथे होणार आहे. दुसरी कसोटी 2 फेब्रुवारीपासून सुरू होईल.
कोहलीच्या निर्णयानंतर, बीसीसीआयने मीडिया आणि त्याच्या चाहत्यांना विनंती केली आहे की त्यांनी या काळात त्याच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि त्याच्या वैयक्तिक कारणाबाबतचे अंदाज लावणे टाळावे. कोहलीने याबाबत रोहित शर्मा, संघ व्यवस्थापन आणि निवड समितीशी चर्चा करूनच निर्णय घेतल्याचे समजते आहे.
कसोटी फॉरमॅटमध्ये कोहलीची इंग्लंडविरुद्ध कामगिरी चमकदार राहिली आहे. अशा परिस्थितीत पहिल्या दोन कसोटीतून त्याचे बाहेर होणे हा टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे विराटच्या अनुपस्थितीत चौथ्या क्रमांकावर कोणाला खेळवायचे हा प्रश्न भारतीय संघ व्यवस्थापनासमोर निर्माण झाला आहे. सध्या रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल संघासाठी डावाची सुरुवात करतील, तर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर येईल. त्यानंतर श्रेयस अय्यरला चौथ्या क्रमांकावर तर केएल राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळू शकते.
भारतीय भूमीवर इंग्लंडविरुद्ध खेळताना विराटच्या बॅटमधून खूप धावा आल्या आहेत. त्याने मायदेशात इंग्लिश संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या 13 कसोटी सामन्यांत 56.38 च्या सरासरीने आणि 3 शतकांसह 1015 धावा केल्या आहेत. हैदराबादमध्येही विराटचे रेकॉर्ड खूप प्रभावी आहे. तो येथे कसोटीत सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. कोहलीने हैदराबादमध्ये आतापर्यंत 4 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 1 शतकासह 379 धावा केल्या आहेत. विराटची ही आकडेवारी पाहता त्याच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचे प्रदर्शन कसे होईल याची चिंता चाहत्यांना लागली आहे.