

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli Test Ranking : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील अर्धशतकी खेळीचा फायदा झाला आहे. या खेळीच्या जोरावर तो आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेण्यात यशस्वी झाला आहे. त्याने तब्बल दोन वर्षांनंतर अव्वल 10 मध्ये स्थान मिळवले असून सध्या तो 9व्या क्रमांकावर आहे. दुरीकडे पहिल्या कसोटीत खराब कामगिरी करणारा कर्णधार रोहित शर्माची 14व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
कोहलीने चार स्थानांची मोठी झेप घेतली आहे. 761 च्या रेटिंगसह तो थेट नवव्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या डावात 64 चेंडूत 38 धावा आणि दुसऱ्या डावात 82 चेंडूत 76 धावा केल्या होत्या. त्याचा फायदा त्याला रेटिंगमध्ये झाला आहे. कोहली हा कसोटी क्रमवारीच्या पहिल्या 10 मध्ये असणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे. ऋषभ पंत 12 व्या क्रमांकावर आहे. तो एका वर्षाहून अधिक काळ क्रिकेटपासून दूर आहे. ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडला चार स्थानांचे नुकसान झाले असून तो थेट दहाव्या क्रमांकावर घसरला आहे. त्याचे रेटिंग 754 आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला चार स्थानांचे नुकसान झाले आहे. याआधी त्याने टॉप 10 मध्ये आपले स्थान कायम राखले होते, मात्र आता तो थेट 14व्या स्थानावर घसरला आहे. त्याचे रेटिंग सध्या 719 आहे.
आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत पहिल्या तीन स्थानांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. न्यूझीलंडचा केन विल्यमसन (864 रेटिंग) पहिल्या, इंग्लंडच्या जो रुट (859) दुसर्या, स्टीव्ह स्मिथ (820) तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलने तीन स्थानांची मोठी झेप घेतली आहे. डॅरिल मिशेलचे रेटिंग आता 786 पर्यंत वाढले असून तो थेट चौथ्या क्रमांकावर आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजा (785) आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम (782) यांचे स्थान एका स्थाने घसरले आहे. ख्वाजा पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन 777 च्या रेटिंगसह एक स्थानाने प्रगती करत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. इंग्लंडच्या हॅरी ब्रूकलाही एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता 773 रेटिंगसह आठव्या स्थानी आहे.