

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : R Hari Kumar : देशाचे नौदल प्रमुख म्हणून आर. हरी कुमार यांनी मंगळवारी कार्यभार स्वीकारला. गत महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या ऍडमिरल करमबीर सिंग यांची जागा हरी कुमार यांनी घेतली आहे. नौदल प्रमुख होण्यापूर्वी ते वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ होते. पदभार घेण्यापूर्वी हरी कुमार यांनी आपल्या मातोश्रींचे आशीर्वाद घेतले.
चालू वर्षाच्या सुरुवातीला आर. हरी कुमार यांची पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून नेमणूक झाली होती. त्यानंतर वर्षभराच्या आतच त्यांच्याकडे नौदल प्रमुखपद देण्यात आले आहे. कार्यभार घेतल्यानंतर हरी कुमार यांना साऊथ ब्लॉकमध्ये मानवंदना देण्यात आली.
देशाचे सामुद्रिक हित जपणे आणि विविध प्रकारच्या आव्हानांना समर्थपणे तोंड देणे, याकडे आपला कटाक्ष असेल असे कुमार यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. 12 एप्रिल 1962 रोजी जन्मलेले हरी कुमार 1983 साली नौदल सेवेत रुजू झाले होते.
39 वर्षांच्या दीर्घ कालावधीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेले आहे.
आयएनएस निशांक, आयएनएस कोरा, आयएनएस रणवीर तसेच विमानवाहू लढाऊ जहाज आयएसएस विराटचे कमांडिंग त्यांनी केलेले आहे.