बिहारमध्ये चौथ्या टप्प्यात दिग्गज उमेदवार रिंगणात

बिहारमध्ये चौथ्या टप्प्यात दिग्गज उमेदवार रिंगणात
Published on
Updated on

बिहारमध्ये 13 मे रोजी दरभंगा, उजियारपूर, समस्तीपूर, बेगुसराय आणि मुंगेर या पाच मतदार संघांत चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. यामध्ये काही दिग्गज उमेदवारांचा समावेश आहे, तर काही जण प्रथमच राजकीय रिंगणात उतरणार आहेत. या सगळ्याचर मतदार संघांतील सामने रंगतदार होण्याची अपेक्षा आहे.

बिहारमध्ये 40 जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार असून, त्यातील 14 मतदार संघांत आतापर्यंत मतदान पार पडले आहे. सुरुवातीपासून या राज्यामध्ये एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात अटीतटीचे सामने होत असल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे फायरब्रँड नेते गिरिराज सिंह बेगुसराय मतदार संघातून पुन्हा एकदा आपले भाग्य आजमावत आहेत. माकपचे अवधेश कुमार राय यांच्याशी त्यांची लढत होणार आहे. माकपला मानणारा मतदारांचा एक मोठा वर्ग या मतदार संघात असल्यामुळे सिंह यांना विजयासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागेल. आणखी एक केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय यांना भाजपने उजियारपूरमधून तिकीट दिले आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका जाहीर सभेत त्यांचा उल्लेख बडा आदमी असा केला होता. त्यामुळे यावेळी विजयी झाल्यास त्यांना केंद्रात आणखी मोठी जबाबदारी दिली जाईल, असे संकेत शहा यांनी दिले आहेत. माजी मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अलोक मेहता यांच्याशी त्यांचा मुकाबला होणार आहे. मेहता हे लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय मानले जातात. राय यांनी लागोपाठ दोनदा उजियारपूरमधून लोकसभेची निवडणूक जिंकली असून, यावेळी ते हॅट्ट्रिक करण्याची अपेक्षा बाळगून आहेत. दरभंगा मतदार संघातून खासदार गोपलजी ठाकूर यांना भाजपने मैदानात उतरविले आहे. त्यांची लढत राजदचे नेते आणि माजी मंत्री ललित यादव यांच्याशी होत आहे. ही लढत चुरसपूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

समस्तीपूरमध्ये रंगतदार सामना

ज्येष्ठ मंत्री अशोक चौधरी यांची कन्या शांभवी चौधरी समस्तीपूर मतदार संघातून भाग्य आजमावत आहे. त्यांना लोकजनशक्ती पक्षाच्या रामविलास पासवान गटाने उमेदवारी दिली आहे. जदयूचे मंत्री महेश्वर हजारी यांचे चिरंजीव सनी हजारी यांच्याशी त्यांचा मुकाबला होणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही उमेदवार पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जदयूचे सर्वेसर्वा तथा मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी घेतलेल्या जाहीर सभेला महेश्वर हजारी यांनी मारलेली दांडी वादळापूर्वीचे संकेत ठरण्याची शक्यता दिसून येते. त्यामुळे येथे कोणाला विजय मिळणार, याकडे संपूर्ण बिहारचे लक्ष लागले आहे.

मुंगेर मतदार संघातून जदयूचे माजी अध्यक्ष राजीव रंजन सिंह यांचा मुकाबला राजदचे बाहुबली नेते अशोक महातो यांची पत्नी अनिता देवी यांच्याशी होणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे, या मतदार संघात महातो याची दहशत दिसून येते. यावेळी भाजपला बिहारमधून
चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. त्याला अनुसरून मुंगेर आणि दरभंगा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन प्रचारसभा नुकत्याच पार पडल्या आहेत. या दोन्ही सभांना दणदणीत प्रतिसाद मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news