जगभरातील जहाल विषारी साप.. (पहा फाेटाे)

जगभरातील जहाल विषारी साप.. (पहा फाेटाे)
Published on
Updated on

जगभरात सापांच्या अनेक प्रजाती आहेत. त्यापैकी काही बिनविषारी आहेत तर काही विषारी. विषारी सापांमध्येही अनेक साप असे आहेत जे अतिशय जहाल असे विषारी सर्प आहेत. अशाच काही सापांची ही माहिती…

इनलँड तैपन

सर्वात जहाल सापांमध्ये हा साप अव्वल स्थानावर आहे. 'इंटरनॅशनल जर्नल ऑफ न्यूरोफार्मेकोलॉजी'नुसार त्याच्या विषाचा एक थेंब माणूस किंवा अन्य प्राण्यास मृत्यूच्या जबड्यात ढकलण्यास पुरेसा आहे. हा साप ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड आणि दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या पूरक्षेत्रात जमिनीच्या भेगांमध्ये राहतात. उंदरांच्या बिळांचाही हे साप आसरा घेत असतात. हे साप मानवी संपर्कात क्वचितच येतात. ज्यावेळी त्याला धोका आहे असे जाणवते त्यावेळी तो दंश करण्यापूर्वी आपल्या देहाला इंग्रजी 'एस' आकारात उचलतो आणि एकदा किंवा अनेकदा दंश करतो.

कोस्टल तैपन

हा दुसर्‍या क्रमांकाचा अत्यंत विषारी सर्प आहे. समुद्राच्या किनारपट्टीजवळ राहणारा हा साप अत्यंत वेगवान असतो. अनेक वेळा तो कधी येऊन चावून गेला हेही लोकांना समजत नाही. ओलसर जंगलांमध्ये हे साप राहतात. ज्यावेळी त्याला धोका जाणवतो त्यावेळी तो तोंड उघडून शत्रूच्या दिशेने झेप घेतो. या काळात तो आपल्या तोंडातून विष फेकतो. 1956 मध्ये या सापाच्या विषाचा परिणाम कमी करणारे औषध बनवण्यात आले. तत्पूर्वी, या सापाने ज्याला दंश केला त्याचा मृत्यू ठरलेला असे!

किंग कोब्रा

हा जगातील सर्वात मोठा विषारी सर्प असून त्याचा मुख्य आहार म्हणजे अन्य सर्प. लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमच्या माहितीनुसार त्याची लांबी 5.4 मीटरही असू शकते. कोणत्याही हालचाल करणार्‍या वस्तूला हा शंभर मीटर अंतरावरूनही स्वच्छ पाहू शकतो. हा नागराज दंशावेळी सुमारे 7 मिली विष सोडतो. एकावेळी तो तीन ते चार वेळा दंश करू शकतो. त्याच्या दंशाने माणूस पंधरा मिनिटांत आणि हत्ती काही तासांतच मृत्युमुखी पडू शकतो. किंग कोब्रा भारतातही आढळून येतो.

बँडेड करैत

हा विषारी सापही भारतात आढळतो. तो दिवसा धीम्या गतीने हालचाल करतो. रात्रीच्या वेळी त्याचा दंश होण्याचा धोका अधिक असतो. त्याच्या विषाने स्नायू कमजोर होतात व श्वासोच्छ्वासात अडथळा येतो. हवा फुफ्फुसापर्यंत पोहोचू न शकल्याने माणूस गुदमरून मृत्युमुखी पडतो.

वायपर स्नेक

'सॉ स्केल्ड वायपर' हा साप अत्यंत विषारी असतो व भारतात सर्पदंशाने होणारे सर्वाधिक मृत्यू या सापाचेच असतात. मराठीत या सापाला 'फुरसे' असे म्हटले जाते व कोकणात हे साप अधिक प्रमाणात आढळतात. हा साप 'हिस्स' असा आवाज काढतो व शरीराचे वेटोळे एकमेकाला रगडून कडकड ध्वनी काढतो. या सापाचा दंश झालेल्या ठिकाणी सूज व वेदना निर्माण होते. कालांतराने हॅमरेजही होऊ शकते. त्याचे विष रक्तात भिनल्यावर रक्ताच्या गुठळ्या बनतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news