वेध लोकसभेचे – उत्तमराव राठोड : तीन टर्म खासदार

उत्तमराव राठोड
उत्तमराव राठोड
Published on
Updated on

1989 नंतर देशात हिंदुत्वाचे वारे वाहू लागल्यानंतर मराठवाड्याचेही राजकीय चित्र बदलले. काँग्रेसचे वर्चस्व असणार्‍या या भागातील राजकीय परिस्थितीत परिवर्तन झाले. त्यामुळे त्यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकांचा विचार करावयाचा झाल्यास हिंगोली आणि लातूर हे दोन मतदारसंघ असे होते की तेथे सलग एकाच उमेदवाराला तीन टर्म खासदार म्हणून जनतेने निवडून (हिंगोली : उत्तमराव राठोड, लातूर : शिवराज पाटील चाकूरकर, तीन टर्मपेक्षा अधिक)

भौगोलिक दृष्ट्या विचार केला तर हिंगोली मतदारसंघात हिंगोली, नांदेड, यवतमाळच्या मतदारसंघाचा समावेश होतो. हिंगोली लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली तेव्हापासून नांदेड जिल्ह्यातील किनवट मतदारसंघ हिंगोलीशी जोडलेला. उत्तमराव राठोड हे किनवट तालुक्यातील मांडवीचे रहिवासी. नागपूर येथील हिस्लॉप लॉ कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलेल्या राठोड यांचा प्रारंभापासूनच काँग्रेसशी संबंध. उच्च विद्याभूषित, हिंदी, इंग्रजीवर प्रभुत्व असणारे राठोड हे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य राहिलेले. 1957 ते 80 पर्यंत दोन्ही पैकी एका सभागृहाचे सदस्यपद राहिलेल्या राठोडांनी महसूल राज्यमंत्रीपदाची जबाबदारी काही काळ सांभाळली होती. किनवट हा आदिवासी बहुल मतदारसंघ. नांदेड, हिंगोली या शहरापाासून दूर असणारा. नक्षलवाद फोफावलेला हा भाग. तेथून नक्षली आव्हानांना तोंड देत ते प्रतिनिधीत्व करीत राहिले, हे विशेष. खासदारकीच्या काळात सार्वजनिक लेखा समिती, रेल्वे समिती, दूरसंचार खात्याच्या सल्‍लागार समितीवर त्यांनी काम केले.

साहित्यिकांशी संबंध

माहिती आणि जनसंपर्क महासंचलनालयाचे सेवानिवृत्त अधिकारी मोहन राठोड हे मांडवी भागातील रहिवासी. फेसबुकवर त्यांनी उत्तमराव राठोड यांच्याविषयी आठवणी जागवल्या आहेत. ते लिहितात, साहित्य, संगीत ,सामाजिक , राजकीय असं अष्टपैलू व्यक्तीमत्व होतं त्यांचं..! राठोड साहेबांची मांडवी सांगताना छाती फुगून येते …सुरेश भट, गुलाम अली, ग. दि.माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर ,रणजित देसाई अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांशी त्यांचे मैत्रीपूर्ण व जिव्हाळ्याचे संबंध होते ..80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे त्यांचे सूत्र होते ..लाडी लबाडी, कटकारस्थान..असे उद्योग त्यांनी कधीच केलं नाही ..निर्मळ, स्वच्छ जीवन ते जगले..किनवट विधानसभा आणि हिंगोली लोकसभेचं प्रतिनिधीत्व करताना आपल्या क्षेत्राचं मान उंचावेल अशीच कामगिरी त्यांनी केली.

विधानसभेत असताना किनवटचं नाव महाराष्ट्राला माहिती झालं होतं, तर लोकसभेत असताना संपूर्ण देशाला हिंगोलीची ओळख झाली! राजीव गांधी प्रधानमंत्री असताना ते संसदीय सचिव म्हणून निवडून आले होते. त्यांची ती कारकिर्द अत्यंत संस्मरणीय राहिली. नावाप्रमाणे ते एक उत्तम संसंदपटू होते. संसदेत बोलताना त्यांचे भाषण अभ्यासपूर्ण असायचे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रश्नावर बोलायचे. मंडल आयोगावर बोलणारे ते पहिले खासदार होते. एक सुसंस्कृत, उच्च विद्याविभूषित लोकप्रतिनिधी लाभले, हे आमचे भाग्य म्हणावे लागेल..

डॉ. बापू काळदातेंचा केला पराभव

1980 साली उत्तमराव राठोड यांनी जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. बापूसाहेब काळदाते यांचा 1 लाख 17 हजार 224 मतांनी, 1984 ला शंकरराव खराटे यांचा 1,35,091 तर 1991 ला भाजपचे विलास गुंडेवार यांचा 71,170 मतांनी पराभव केला. सलग तीन वेळा लोकसभेत विजय संपादन करणार्‍या राठोड यांना 1991 मध्ये मात्र भाजपचे विलास गुंडेवार यांच्याकडून अवघ्या 3793 मतांनी पराभव पत्करावा लागला होता. 1982 साली इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्यांचा उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरव करण्यात आला होता. माहूर येथे पुराणवस्तू संग्रहालयासाठी त्यांनी प्राचीन कला, वस्तू जमा केल्या. येलदरी, इसापूर धरणासाठी त्यांनी प्रयत्न केले. गोर बंजारा व गोंड आदिवासी समाजातील लोक कलावंताना त्यांनी 1989 साली मुंबईला नेले व त्यांच्या पारंपरिक कलेच दूरदर्शन वरून थेट कार्यक्रमाचे प्रसारण केले होते. 1981 साली त्यांनी इंदिरा गांधी यांना बंजारा समाजाचा पोषाख भेट देत परिधान करण्यास भाग पाडले होते. या वेळी त्यांच्यासोबत किनवट लोककलाकार होते. त्यांनी सादर केलेल्या नृत्यात इंदिराजी सहभागी झाल्या होत्या. सांसदीय राजकारणातून बाहेर पडल्यानंतर ते काही काळ एमटीडीसीचे अध्यक्षही होते. शिवाय शिक्षण, सामाजिक कार्याला त्यांनी वाहून घेतले. राठोड यांची नात नेहा राठोड ही बंजारा समाजाची पहिली महिला पायलट आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news