व्हेरिकोज व्हेन्सची समस्या आणि उपचार, जाणून घ्‍या सविस्‍तर

व्हेरिकोज व्हेन्सची समस्या आणि उपचार, जाणून घ्‍या सविस्‍तर
Published on
Updated on

दरवर्षी व्हेरिकोस व्हेन्स ने कोट्यवधी लोक त्रस्त होत आहेत. याचा त्रास अधिकतर केसेसमध्ये पायामध्ये जास्त होतो कारण सतत उभे राहिल्याने आणि चालण्याच्या दबावामुळे शरीराच्या खालच्या भागातील शिरांवर ताण पडत असतो. यामध्ये शिरा मोठ्या आणि वेड्यावाकड्या होतात.

धमन्या या हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांकडे शुद्ध रक्ताचा पुरवठा करत असतात. तर शिरांच्या माध्यमातून अशुद्ध रक्त हे शरीराच्या विविध अवयवांकडून हृदयाकडे पाठवले जात असते. हृदयाकडे रक्त पाठवत असतांना या शिरांना गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात काम करावे लागते. खराब किंवा कमकूवत व्हॉल्व्ह्जमुळे व्हेरिकोस व्हेन्स होतात.

पायाच्या स्नायूंची आकुंचन पावण्याची क्रिया ही पंपासारखी काम करत असते आणि शिरांच्या लवचिकते मुळे रक्त हे हृदयाकडे पाठवले जाते. या शिरांमध्ये असलेले हे छोटे व्हॉल्व्ह्ज रक्त हृदयाकडे घेऊन जातांना उघडतात आणि बंद झाल्यामुळे रक्त पुन्हा पाठी येत नाही. जेव्हा हे व्हॉल्व्ह्ज कमकूवत होतात किंवा खराब होतात त्यावेळी रक्त हे पुन्हा मागे येऊ लागते आणि शिरांमध्ये साठून राहते, ज्यामुळे रक्तवाहिन्या फुगतात आणि वेड्यावाकड्या होतात.

व्हेरिकोस व्हेन्समुळे विशेषकरून घोट्यापाशी जखमा होतात. कधीकधी शिरांमध्ये ताण येऊन त्या वाढतात, त्यामुळे पाय दुखू लागतात आणि पायाला सूजही येते. काही केसेस मध्ये त्वचेजवळील शिरा फूटतात आणि त्यामुळे रक्तस्रावही होऊ लागतो.या भागातील त्वचा काळी पडते आणि कधीकधी खाज सुटू लागते अशा परिस्थितीला व्हेरिकोस एक्झिमा असेही म्हणतात. सामान्यत: व्हेरिकोस व्हेन्स वर सर्जिकल पध्दतीने किंवा लेझर/ रेडिओफ्रीक्वेन्सी ब्लेशन सारख्या थर्मल ब्लेशन सारखे उपाय केले जातात.

व्हेरिकोस व्हेन्स मधील सर्वात अत्याधुनिक उपचाराला व्हेनासील (ग्लू एम्ब्लॉयझेशन) असे म्हटले जाते, यामध्ये एक मेडिकल ग्रेड गोंद वापरला जातो ज्याचा उपयोग करून पायातील सॅफेनस शिरा या पूर्णत: बंद केल्या जातात. कालांतराने या बंद झालेल्या शिरा आकुंचन पावतात आणि नाहीशा होतात. ही उपचारपद्धती फक्त एका सूईच्या आतून (पिनहोल) लोकल अ‍ॅनेस्थेशियाच्या माध्यमातून होते.

रुग्णाला या प्रक्रियेत खूपच कमी त्रास होतो. व्हेनासील तंत्रामध्ये कोणत्याही प्रकारच्या स्टॉकिंग्जची गरज नसते. रुग्ण लवकर बरा होतो आणि तो उपचार घेतल्यानंतर लगेचच आपले रोजचे काम सुरू करू शकतो. हे उपचार वयोवृद्ध रुग्णांसाठी किंवा अनेक आजार असणार्‍या लोकांसाठीही अतिशय सुरक्षित आहेत. याचे कोणतेही दुष्परिणाम दिसून येत नाहीत.

डॉ. संतोष पाटील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news