

माऊली शिंदे
वडगाव शेरी, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेकडून 'स्मार्ट सिटी'च्या धर्तीवर शहरी पथ धोरणांतर्गत 'अर्बन स्ट्रीट गाइड लाइन' प्रकल्प राबविण्यात आला. यानुसार विमाननगर चौक ते चंदननगर यादरम्यान सायकल ट्रॅक व पदपथाच्या कामाचे भूमिपूजन होऊन चार वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, अजूनही हे काम पूर्ण झाले नाही.
या प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या सायकल ट्रॅक व पदपथाची देखभालीअभावी सध्या दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. 'अर्बन स्ट्रीट गाइड लाइन'नुसार नगर रोडवरील गुंजन चौक ते चंदननगर या रस्त्याच्या डाव्या बाजूला 11 कोटी रुपयांच्या निधीतून सायकल ट्रॅक आणि पदपथ बांधण्यात येणार होते. या कामाचे भूमिपूजन विमाननगर चौकात 29 जुलै 2018 रोजी करण्यात आले. मात्र, गेल्या चार वर्षांत केवळ विमाननगर चौक ते चंदननगर, खुळेवाडी चौकादरम्यान पदपथ आणि सायकल ट्रॅकचे काम करण्यात आले आहे. ते काम देखील अर्धवट अवस्थेत आहे.
टाटा गार्डन 9 बीआरडीच्या ठिकाणी पदपथ मध्ये संपत आहे. पदपथावर ठिकठिकाणचे सुशोभीकरणाचे काम अर्धवट आहे. तसेच पदपथ ठिकठिकाणी तुटले आहे. सायकल ट्रॅक काही ठिकाणी तोडला आहे. या पदपथावरून गाड्या जाऊ नयेत, यासाठी लावलेले दगडी खांब देखील तुटले आहेत. पदपथाच्या कडेचे काही पथदिवे बंद आहेत. या ठिकाणी रात्री मद्यपी आणि गर्दुल्ले यांचा वावर असतो. या पदपथावर ठिकठिकाणी दारूच्या मोकळ्या बाटल्या पडलेल्या दिसून येत आहे. पदपथावरील कचरा वेळेवर साफ केला जात नाही तसेच त्यावर गवतही वाढले आहे. पदपथाच्या कडेला उद्यान विभागाने लावलेली शंकासुरची झाडे अस्ताव्यस्त वाढली आहेत.याबाबत स्मार्ट सिटीचे उपअभियंता सुरेश बोरसे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
महापालिकेने करोडो रुपये खर्च करून पदपथ व सायकल ट्रॅक उभारला आहे. मात्र, देखभाल व दुरुस्तीअभावी त्याची दुरवस्था झाली आहे. प्रशासनाने या प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्तीकडे लक्ष दिले पाहिजे.
-शिवाजी वडघुले, स्थानिक नागरिक
विमाननगर चौक ते चंदननगर यादरम्यान 'अर्बन स्ट्रीट गाइड लाइन'नुसार ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची व्यवस्था, व्यायाम, सायकल ट्रॅकची, पदपथावरील झाडांचे सुशोभीकरण, पादचार्यांसाठी जागोजागी बाकड्यांची व्यवस्था, विद्युतव्यवस्था, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था आदी कामे करण्यात येणार होती. मात्र, यापैकी मोजकीच कामे झाली आहेत. यामुळे इतर सुविधांचे काय झाले, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे.
नगर रोडवरील गुंजन चौक ते चंदननगर यादरम्यान प्रकल्पाची उभारणी.
सायकल ट्रॅक आणि पदपथासाठी 11 कोटी रुपयांचा निधी.
या कामाचे विमाननगर चौकात 29 जुलै 2018 रोजी झाले होते भूमिपूजन.
चार वर्षांत केवळ विमाननगर चौक ते चंदननगर, खुळेवाडी चौकांदरम्यान काम.
पदपथावर ठिकठिकाणचे सुशोभीकरणाचे काम अद्यापही अर्धवट