

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्यात भाजप सरकारकडून अनेक विकासकामे प्रगतिपथावर आहेत. केंद्र सरकारकडूनही महत्त्वपूर्ण सहकार्य केले जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत गोव्याच्या दोन्ही जागांवर कमळ फुलणारच, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गोवा दौर्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. रविवारी (दि. 16) फार्मागुडी येथे झालेल्या सभेत त्यांनी गोमंतकीयांना संबोधित केले. लोकसभेसाठी दक्षिण गोवा यावेळी आपल्या झोळीत घाला, असे आवाहन केले.
अमित शहा यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या गोव्यातील कामगिरीचा उल्लेख करून त्यांची स्तुती केली.
शहा म्हणाले, केंद्र सरकारचे गोव्याला सर्वतोपरी सहकार्य असेल. जगाच्या नकाशावर गोव्याची ठळक ओळख आहे. गोवा हे भारत मातेच्या कपाळावरील बिंदीप्रमाणे आहे. गोव्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला दोन्ही जागांवर गोमंतकीयांनी विजय मिळवून द्यावा.
शहा यांनी माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची आठवण काढून त्यांना आदरांजली वाहिली. गोव्याच्या या सुपुत्राने संरक्षणमंत्री म्हणून विशेष कामगिरी केली ती अविस्मरणीय असल्याचे सांगून त्यांनी गोव्यातील पर्रीकर यांच्या कार्याचाही गौरव केला.