

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : शहरालगतच्या एका गावातील अल्पवयीन मुलगी अल्पवयीन मुलानेच वारंवार केलेल्या अत्याचारातून गरोदर राहिल्याचे पुढे आले. याबाबत श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित अल्पवयीन मुलगा पसार झाला असून, त्याला मदत करणार्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले, की संबंधित मुलगी (वय 13) नववीत, तर मुलगा दहावीत शिकत आहे. मुलाने या मुलीवर अनेकवेळा अत्याचार केला. त्यासाठी त्याचा मित्र आदित्य (वय 20) मदत करत होता. आदित्य मुलीला दुचाकीवरून संबंधित मुलाकडे नेई व पुन्हा सोडून देई.
दरम्यान, दोन-तीन दिवसांपूर्वी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबीयांनी तिला दवाखान्यात नेले तेव्हा ती गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. त्या वेळी मुलीने अत्याचाराबाबत सांगितले. मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आदित्यला अटक केली असून, अल्पवयीन आरोपी मात्र पसार झाला आहे. त्याचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुंजे, निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी मुलीच्या पालकांची भेट घेतली. उपनिरीक्षक श्रीमती देवरे तपास करीत आहेत.