

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या युवा महिला संघाने आता अंडर-19 टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धदक मारली आहे. भारतीय महिला अंडर-19 संघ आता वर्ल्ड चॅम्पियन होण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात टीम इंडियाने सहज विजय मिळवला. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना अक्षरश: लोटांगण घालण्यास भाग पाडले. त्यामुळे किवींचा संघ 20 षटकांत 9 बाद 107 धावांपर्यंतच मजल मारू शकला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने अवघ्या 14.2 षटकांत 2 गडी गमावून 108 धावांचे माफक लक्ष्य गाठले आणि सामना 8 विकेट्स, 36 चेंडू राखून जिंकला.
गोलंदाज पार्श्वी चोप्रा आणि सलामीवीर फलंदाज श्वेता शेरावत या भारताच्या विजयाच्या स्टार ठरल्या. पार्श्वीने 4 षटकात केवळ 20 धावा देत 3 बळी घेतले. तर फलंदाजीत सलामीवीर श्वेता शेरावतने 45 चेंडूत 61 धावांची नाबाद खेळी साकारून संघाला सहज विजय मिळवून दिला. याशिवाय, भारतीय कर्णधार शफाली वर्माने गोलंदाजीत खूप किफायतशीर योगदान दिले. शेफालीने 4 षटके टाकली आणि 1 बळी घेताना फक्त 7 धावा दिल्या. याशिवाय तीतस साधू, मन्नत कश्यप, अर्चना देवी यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
भारताची कर्णधार शेफाली वर्मा हिने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवत किवी संघाच्या फलंदाजीला सुरुंग लावला आणि एकापाठोपाठ एक त्यांचे फलंदाज तंबूत पाठवले. न्यूझीलंडची पहिली विकेट तीन धावांवर पडली आणि दोन्ही सलामीवीर पाच धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परतले. अॅना ब्राउनिंगने एक आणि एम्मा मॅक्लिओडने दोन धावा केल्या. यानंतर जॉर्जिया प्लिमरने एक टोक सांभाळले. तिला इसाबेलने चांगली साथ दिली. तिने 22 चेंडूत 26 धावा केल्या आणि किवी संघाला सामन्यात कमबॅक करण्यास मदत केली. कर्णधार शार्पही 13 धावा करून बाद झाली. न्यूझीलंडचा निम्मा संघ 74 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर एम्मा इर्विन तीन, केट इर्विन दोन, लॉगनेबर्ग चार आणि नताशा तीन धावांवर बाद झाली. दरम्यान, वेगवान धावा काढण्याच्या प्रयत्नात 32 चेंडूत 35 धावा केल्यानंतर प्लिमरही बाद झाली. नाइटच्या 12 धावांच्या खेळीने न्यूझीलंडची धावसंख्या 100 धावांच्या पुढे गेली. अखेर न्यूझीलंडचा संघ नऊ गडी गमावून 107 धावाच करू शकला. जॉर्जिया प्लिमर (35) आणि इसाबेला जॉर्ज (26) यांनी सर्वाधिक धावांचे योगदान दिले.
108 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. शेफाली वर्मा आणि श्वेता सेहरावत या जोडीने 3.3 षटकातच 33 धावांची सलामी दिली. मात्र, शेफाली 10 धावा काढून तंबूत परतली. यानंतर श्वेता सौम्या तिवारीच्या साथीने न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. सौम्या एका टोकाकडून संयमी फलंदाजी करत होती, तर दुस-या टोकाकडून श्वेताने किवी गोलंदाजांची धुलाई सुरूच ठेवली. तिने अर्धशतक झळकावून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचवले. 12.2 व्या षटकात ही जोडी फुटली. सौम्या 26 चेंडूत 22 धावा काढून बाद झाली. यावेळी टीम इंडियाला विजयासाठी 13 धावांची गरज होती. विजयाची ही औपचारिकता श्वेता आणि त्रिषाच्या जोडीने पूर्ण केली आणि महिलांच्या पहिल्या-वहिल्या अंडर 19 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला पोहचवले.
संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाने फक्त एकच सामना गमावला आहे. पहिल्या सामन्यात भारताने द. आफ्रिकेचा 7 गडी राखून पराभव करत विजयी सुरुवात केली होती. यानंतर संघाने यूएईचा 122 धावांनी पराभव करत शानदार विजयाची नोंद केली. त्यानंतर स्कॉटलंडचाही भारतीय संघाकडून पराभव झाला. यानंतर, एकमेव धक्का बसला तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध. जिथे टीम इंडियाला केवळ 87 धावांवर ऑल आऊट झाली आणि सामना 7 विकेटने गमावला. त्या पराभवानंतर शेफालीच्या संघाने दमदार पुनरागमन केले आणि श्रीलंकेवर 7 गडी राखून मात केली. आता न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघ ड गटात आणि नंतर सुपर सिक्समध्ये गुणतालिकेत अव्वल होता.