सोलापूर : रे-नगरसाठी अवघ्या 2 महिन्यांत साकारले वीज उपकेंद्र

सोलापूर : रे-नगरसाठी अवघ्या 2 महिन्यांत साकारले वीज उपकेंद्र

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

आर्थिक व दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी सोलापूर शहरालगत रे नगर येथे 30 हजार घरकुलांचा महाकाय प्रकल्प साकारला जात आहे. त्या घरांना प्रकाशमान करण्यासाठी महावितरणचे 20 एमव्हीए क्षमतेचे 33/11 केव्ही वीज उपकेंद्र विद्युत वेगाने साकारत. अवघ्या दोन महिन्यांमध्ये हे काम पूर्ण केले आहे. येत्या 12 ऑगस्टला वीज उपकेंद्राची चाचणी होणार आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गावच्या हद्दीत पंतप्रधान आवास योजनेतून आर्थिक व दुर्बल घटकांसाठी 30 हजार घरकुलांचा प्रकल्प मंजूर असून, त्यापैकी 10308 घरकुलांचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या घरांना प्रकाशमान करण्यासाठी केंद्र सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेतून महाराष्ट्रातील पहिले 33/11 उपकेंद्र 23 मे 2022 रोजी मंजूर करण्यात आले. संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असून, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आणि संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी अमृत महोत्सवी वर्षाला साजेशी कामगिरी करत रे नगर उपकेंद्राला विक्रमी वेळेत पूर्ण करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प केला आहे.

संचालक ताकसांडे यांनी रे नगर उपकेंद्राला भेट देऊन कामाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. नवीन उपकेंद्राला महापारेषणच्या कुंभारी उपकेंद्रातून 33 केव्ही वाहिनीद्वारे वीज मिळणार आहे. त्यासाठी 6.1 किलोमीटर लांबीची उच्चदाब वाहिनी उभारण्यात आली आहे. तसेच उपकेंद्रातून 14.75 किमी लांबीची 11 केव्ही वाहिनी बाहेर पडणार आहे. या वाहिनीवर 200 केव्हीए क्षमतेची 96 वितरण रोहित्रे घरांना प्रकाशमान करतील. दोन्ही उच्चदाब वाहिनींचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. वितरण रोहित्रांसाठी लागणारी यंत्रणाही तयार आहे. त्यावर येत्या काही दिवसांत रोहित्र उभारण्याचे काम पूर्ण करून उपकेंद्राची चाचणी 12 ऑगस्टला घेण्याचे निर्देश त्यांनी महावितरण अधिकार्‍यांना दिले आहेत. यावेळी मुख्य अभियंता सुनील पावडे, अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्यासह अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news