

बेंबळे : सिद्धेश्वर शिंदे
उघड्या चोचीचा करकोचा व मुग्धबलाक या नावांनी ओळखल्या जाणार्या करकोच्यांनी यंदा उजनीच्या पाणलोट क्षेत्रात हजारोंच्या संख्येेने हजेरी लावली आहे. 'अनास्टोमस आस्किटन्स' या शास्त्रीय व इंग्रजीत 'ओपनबिल स्टॉर्क' या नावाने ओळखले जाणारे हे करकोचे सध्या पाण्यापासून मुक्त झालेल्या हिरवळीवर खाद्य मटकावत शेकडोंच्या संख्येने अनेक समूह करून पाण्याच्या काठावर चरताना दिसून येत आहेत. यामुळे मुग्धबलाक या पक्ष्यांच्या वावराने उजनीकाठ बहरला आहे.
राखी बगळ्यापेक्षा थोडासा लहान आकार असलेला हा पाणपक्षी पाणथळावर चित्रबलाक, चमचेचोच, पांढरे कुदळे, पाणकावळे आदी पक्ष्यांसमवेत भागीदारी करत खाद्य निवडताना आढळतो. या पक्ष्यांची उंची सामान्यपणे अडीच फुटांपर्यंत असते. लांबून हा पक्षी श्वेतबलाक (व्हाईट स्टॉर्क) सारखाच दिसतो. शरीराचा रंग करडा असतो व पंख काळे असतात. मान पांढरी असते. शेपटी आतून व दोन्ही बाजूंनी दबल्यामुळे चपटी झालेली असते व ती काळ्या रंगाची असते. नर-मादी दिसायला सारखेच असतात. गोगलगायी, शंख-शिंपले, खेकडे हे या पक्ष्यांचे प्रमुख खाद्य असून ते मासे, बेडूक, चिखलातील मोठे किडे, इतर संधिपाद प्राण्यांवरही उदरनिर्वाह करतात. त्यांच्या चोचीत कमानाकाराची फट असल्यामुळे हे पक्षी शंख शिंपल्यांच्या अंगावरील कठीण कवच फोडून आतील लुसलुशीत मांस खात असतात. चोचीचा उपयोग अडकित्त्याप्रमाणे करतात.
दोन्ही चोची मिटल्यानंतर वरच्या आणि खालच्या चोचींमध्ये चंद्रकोरीच्या आकाराची फट दिसते. यावरून या पक्ष्यांना तोंडफट्या, उघड्या तोंडाचा करकोचा या नावाने ओळखतात. भौगोलिक परीस्थितीला अनुसरून देशातील विविध भागांत विणीवर जाणार्या या पक्ष्यांमध्ये आवाजाचा कंठ नाही. त्यामुळे यांना मुग्धबलाक हे नाव दिले आहे. एरव्ही मुके असलेले हे करकोचे फक्त विणीच्या काळात एकमेकांना साद घालताना नर-मादी दोघेही आपल्या चोचीचा भाग एकमेकांवर आपटून आवाज काढतात. मिलन काळात मादीच्या घशातून गुरगुर आवाज निघतो, तर नर पक्षी या काळात चोचींची उघडझाप करत कटकट असा आवाज काढून मादीशी संवाद साधतो.
दरवर्षी उजनी धरणातून कमाल प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर धरण क्षेत्रातील जलावृत्त भाग उघडा पडतो. अन्यत्र विखरून असलेले हजारो मुग्धबलाक उजनीवरील हिरवळीवर रेसिपीसाठी एकत्र जमतात. उजनी जलाशय परिसर म्हणजे या पक्ष्यांना जणू माहेरच आहे. घरटे साकारण्यापूर्वी कडक काड्या पाण्यात बुडवून त्यांच्यात लवचिकता आणण्याची शक्कल लढवणारा हा पक्षी निसर्गातील एक चमत्कार आपल्याला दाखवून देतो.
– डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी व पर्यावरण अभ्यासक