

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या माळशिरस आणि माढा तर नव्याने स्थापन झालेल्या वैराग, श्रीपूर-महाळूंग आणि नातेपुते नगरपंचायतींसाठी मोठ्या चुरशीने सरासरी 77 टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदानासाठी केंद्रांवर मोठ्या रांगा लागल्याचे चित्र होते. सकाळी 8 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान झाले. काही ठिकाणी किरकोळ वादावादीचे प्रसंगी वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले.
पाचही नगरपंचायतींमधील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून 19 जानेवारी 2022 रोजी निकाल लागणार आहे.
माढ्यात 13 जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात असून येथे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेत लढत झाली. माजी आ. धनाजी साठे यांच्यासाठी ही लढत अस्तित्वाची ठरणारी आहे. माढ्यात 77 टक्के मतदान झाले.
वैराग मध्येही 13 जागांसाठी 48 जण मैदानात होते. येथे सेना, भाजप आणि राष्ट्रवादी असा सामना झाला. आ. राजेंद्र राऊत आणि माजी आ. दिलीप सोपल आणि राष्ट्रवादीचे निरंजन भूमकर यांनी येथे ताकद लावली होती. येथेही 77 टक्के मतदान झाले.
माळशिरसमध्येही 13 जागांसाठी 45 जण रिंगणात होते. येथे 82 टक्के मतदान झाले. माळशिरस नगरपंचायतीसाठी माजी उपनगराध्यक्ष अप्पासाहेब देशमुख, माजी सरपंच तुकाराम देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य अनिल सावंत, मारूती देशमुख, सुरेश टेळे, आकाश सावंत आणि अॅड. सोमनाथ वाघमोडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
नातेपुते येथे मात्र स्थानिक आघाड्यांमध्ये चुरशीने लढत झाली. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख आणि भानुदास राऊत या गटात प्रामुख्याने लढत झाली. नातेपुते नगरपंचायतीसाठी सुमारे 78 टक्के मतदान झाले आहे.
श्रीपूर- महाळुंग नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी 83 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे. येथे तिरंगी सामना झाला. चुरशीने 73.94 टक्के मतदान झाले.