सोलापूर : तुळजापूर बसस्थानकाला अतिक्रमणाचा विळखा

सोलापूर :  तुळजापूर बसस्थानकाला अतिक्रमणाचा विळखा
Published on
Updated on

तुळजापूर , पुढारी वृत्तसेवा :  तुळजापूर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या नवीन बसस्थानकासमोर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. बसस्थानकाची अवस्था कचराकुंडीप्रमाणे झाली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकार्‍यांकडून बघ्याची भूमिका घेतली जात असून स्थानिक राजकीय लाभासाठी नगरपरिषद प्रशासनदेखील गप्प आहे.

राज्य सरकारच्या तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत बांधण्यात आलेल्या लातूर रोडवरील नवीन अद्ययावत बसस्थानकाच्या उद्घाटनानंतर या बसस्थानकासमोर लहान व्यवसाय करणार्‍या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. आपल्या व्यवसायाची उभारणी करण्यासाठी या लोकांनी या परिसराची दुरवस्था केली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन या बसस्थानकाला चांगले प्रवेशद्वार केले आहे. देखण्या प्रवेशद्वारासमोर भूमिगत गटारीमध्ये उपयोगात आणावयाचे पाईप आणि मातीचे ढिगारे मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत. याशिवाय घराच्या शेजारी चहा आणि टपर्‍यांमुळे या परिसराचे देखणेपण आणि सुंदरता नष्ट झाली आहे. पोलिस बंदोबस्त आणि अतिक्रमण हटाव मोहीम यांच्या मदतीने अतिक्रमण हटवून बसस्थानकाचे प्रवेशद्वार प्रवासी भाविक भक्तांना खुले करण्याची मागणी होत आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकार्‍यांनी या संदर्भात नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे लेखी पत्र व्यवहार केला पाहिजे. त्यानंतर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने पोलिस बळाचा वापर करून येथील अतिक्रमण कायमस्वरूपी काढले पाहिजे. त्याशिवाय बसस्थानकाचे देखणेपण बाहेरगावाहून येणार्‍या लोकांना दिसणार नाही.

तीर्थक्षेत्र असणार्‍या तुळजापूर येथील नवीन बसस्थानकामध्ये खूप मोठ्या संख्येने भाविक भक्तांची गर्दी आहे. या बसस्थानकामधून राज्यातील अनेक भागांत गाड्या जातात. त्यामुळे येथे प्रवाशांची आणि भाविक भक्तांची खूप मोठी गर्दी आहे. लाखो रुपये खर्जून केलेल्या नवीन बसस्थानकाचे तीन-तेरा वाजल्याचे चित्र दिसत आहे. सर्वत्र मातीचे ढिगारे आणि खड्ड्यांनी बसस्थानक व्यापलेले आहे. मोठ्या प्रमाणात केलेल्या अतिक्रमणामुळे पाऊस आला तर बसस्थानक परिसरात पाणी साचते. त्यामुळे स्थानकात प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. पाऊस पडल्यानंतर येथे पाण्याचे डबके आणि मातीचा चिखल झाला आहे. हा चिखल बसस्थानकाच्या सर्व परिसरात पसरला आहे.

तुळजापूर बसस्थानकासमोर दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच बसस्थानकासमोर अतिक्रमण वाढले असून, बसस्थानकामध्ये जाताना अतिक्रमणामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. तुळजापूर प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन याचा बंदोबस्त करावा.
– सुनील निकम, भाविक भक्‍त

नगरपरिषदेचे दुर्लक्ष
तुळजापूर हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे येथे दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात, मात्र बाहेरून येणार्‍या भाविक भक्तांसाठी तुळजापूर बसस्थानकातील घाण व बसस्थानकाभोवती वाढलेल्या अतिक्रमणामुळे शहराची दुर्दशा झाली आहे. नगरपरिषदेकडून मूलभूत सुविधा पुरवण्यात येत नसून याकडे नगरपरिषद प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news