

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : आषाढी वारीनिमित्ताने जिल्हा परिषदेची यंत्रणा वारीच्या सेवेत तत्पर झाली आहे. आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यात येणार्या वारकर्यांना मूलभूत सुविधा देण्यासाठी पंढरपूरसह अन्य तालुक्यांतील जिल्हा परिषद कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आषाढी वारीनिमित्त जिल्ह्यातील पालखीमार्गांवरील 74 गावांत वारकर्यांसाठी आवश्यक सुविधा देण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा सज्ज झाली आहे. वारकर्यांना कोणत्या सुविधा कशा पध्दतीने पुरविता येतील, यासाठी वरिष्ठ अधिकार्यांच्या सातत्याने बैठका घेण्यात येत आहेत.
सोलापूर जिल्ह्यात संतांच्या पालख्या आल्यानंतर याठिकाणी वारकर्यांना आरोग्यसुविधा देण्यासाठी सुमारे दीड हजार आरोग्य कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ आदी तालुक्यांतील कर्मचार्यांना वारीच्या काळात नियुक्ती देण्यात आली आहे. यासाठी कर्मचार्यांना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
पाणीपुरवठा व स्वच्छतेसाठीही अन्य तालुक्यांतील ग्रामपंचायत कर्मचार्यांची नियुक्ती पालखीमार्गांवरील गावांत करण्यात आली आहे. सुमारे पाचशे ग्रामपंचायत कर्मचारी वारकर्यांना शुध्द पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
याशिवाय पालखीमार्गांवर आलेला कचराही कचरा पेटीच्या माध्यमातून संकलित करण्याचे काम कर्मचार्यांवर सोपविण्यात आले आहे.
आरोग्य विभागाकडून आरोग्य कर्मचार्यांना प्राथमिक उपचारासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. पालखी येण्यापूर्वी व पालखी गेल्यानंतर पालखीमार्गांवरील गावांत फवारणी करण्याची जबाबदारीही ग्रामपंचायत कर्मचार्यांवर सोपविण्यात आली आहे.