मुंबई; पुढारी वृत्तसेवा : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत सीबीआयचा 'लीक' झालेला अहवाल सत्य आहे. मात्र, आपली प्रतिष्ठा आणि स्वत:चा चेहरा वाचवण्यासाठी सीबीआय ने देशमुख यांचे जावई चतुर्वेदी व त्यांचे वकील आनंद डागा यांना अटक केली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी केला.
मलिक म्हणाले, जेव्हा हा रिपोर्ट समोर आला तेव्हा आम्ही याबाबत सीबीआयने खुलासा करावा, अशी मागणी केली होती; पण हा रिपोर्ट खोटा आहे, हे सीबीआय अद्यापही सांगत नाही.
रिपोर्ट 'लीक' झाल्यामुळे सीबीआय हा रिपोर्ट मॅनेज केला म्हणून सांगत आहे. हा रिपोर्ट बाहेर येण्यापूर्वी सीबीआयने कारवाई का केली नाही, असा सवालही मलिक यांनी उपस्थित केला.
रिपोर्ट मॅनेज झाला असल्याचा आरोप करणार्या सीबीआयला आपल्या अधिकार्याने लाच घेतली हे चार महिने झाले तरी लक्षात कसे आले नाही. उलट हा अहवाल कोर्टात सादर झाला, तर अनिल देशमुख यांना दिलासा मिळेल ही भीती आता सीबीआयला वाटत असल्याने त्यांनी हे नाट्य रचले आहे. राजकीय हेतूने चतुर्वेदी व डागा यांना अटक केली, असे मलिक म्हणाले.