सिंधुदुर्गात धो धो.. सुरूच

संग्रहीत
संग्रहीत

कणकवली :वृत्तसंस्था : सोमवार पहाटेपासून मुसळधार सरींनी कोसळणार्‍या पावसाचा जोर मंगळवारीही कायम होता. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक मार्ग, कॉजवे, पूल पाण्याखाली गेल्याने ग्रामीण भागाचा वाहतूक संपर्क खंडित झाला आहे. याबरोबरच पावसामुळे अनेक ठिकाणी वीज व दूरध्वनी वाहिन्यांवर झाडे पडल्याने वीज व संपर्क सेवाही ठप्प झाली आहे. माणगाव खोर्‍याला जोडणारे आंबेरी पूल गेले दोन दिवस पाण्याखाली असल्याने खोर्‍यातील 27 गावांचा संपर्क तुटला आहे. याबरोबरच भूस्खलनाच्या शक्यतेने देवगड- पेंढरी येथील 6 घरांना स्थलांतरणाच्या नोटिसा प्रशासनाने बजावल्या आहेत. किनारपट्टीवरील 60 गावांना सागरी उधाणाचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात 9 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यातील सर्व घाटमार्ग तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे.

मुसळधार व संततधार पावसामुळे जिल्ह्याचे जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. सोमवारी सायंकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. यामुळे काही कॉजवे, पुलांवरील पाणी खाली गेल्याने वाहतूक सुरळीत झाली होती. मात्र, मध्यरात्रीनंतर पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाल्याने कॉजवे, पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प झाली. जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आले आहेत. नदीनाल्यांच्या काठावरील भातशेती वेंगुर्ले-नवाबाग येथे घरावर झाड पडून नुकसान झाले. तर पाल-घाडीवाडी येथे ओहोळाच्या पुरात वाहून जाणार्‍या
तरुणास स्थानिकांनी वाचविले. देवगड तालुक्यातील हिंदळे बाजारपेठेत पुराचे पाणी घुसल्याने व्यापार्‍यांचे नुकसान झाले. सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठेतही पुराचे पाणी घुसले होते. दोडामार्ग तालुक्यातील पिकुळे-शेळपीवाडी वाहून गेली आहे. तर सखल
भागात पाणी साचून राहिल्याने भातशेती कुजून जाण्याची भीती व्यक्‍त होत आहे.

मंगळवार मंदिरावर वटवृक्ष कोसळल्याने मंदिराचे तसेच बाजूला उभ्या कारचे मिळून सुमारे 10 लाखाचे नुकसान झाले. वैभववाडी तालुक्यात काही घरांच्या भिंती कोसळून तसेच घरांवर झाडे पडून नुकसान झाले. कणकवलीकनेडी मार्गावर सांगवे-केळीचीवाडी येथे झाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली होती. जिल्ह्यातील सर्व घाटमार्ग, महामार्ग, रेल्वेमार्ग येथे वाहतूक सुरळीत होती. पावसामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली आहे, मात्र, कोठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

जिल्ह्यात 8 जुलै पर्यंत ऑरेंज अलर्ट 

ओरोस : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 240.3 मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी 155.0 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 1103.9 मि.मी. पाऊस झाला आहे. देवगड वगळता सर्वच तालुक्यात पावसाने शतक पार केले आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड-80.8 (1043.6), मालवण-145.8 (1111.6), सावंतवाडी-190.0 (1263.8), वेंगुर्ले-193.7 (1116.4), कणकवली-148.1 (977.7), कुडाळ- 138.8(1135.2), वैभववाडी-240.3 (1117.9), दोडामार्ग-187.0 (1106.1) असा पाऊस झाला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा-मुंबई यांनी जिल्ह्यात पुढील चार दिवस म्हणजेच 8 जुलै पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या कालावधीमध्ये जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे करण्यात आले आहे.

नव्या मुख्यमंत्र्यांचे लक्ष कोकणावर

गेले दोन दिवस पडणार्‍या मुसळधार पावसाने कोकण किनारपट्टीतील सर्व जिल्ह्यांमध्ये मान्सून जोरदार सक्रिय झाला. मात्र, त्यामुळे अनेक गावांत पूरसद‍ृश स्थिती निर्माण झाली असल्याने नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्राधान्याने कोकणावर लक्ष ठेवले आहे. मुख्यमंत्री कोकणातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकार्‍यांच्या ऑनलाईन संपर्कात असून त्यांच्या निर्देशानुसार संभाव्य पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एन.डी.आर.एफ.चे एक पथक तातडीने चिपळूण येथे तैनात करण्यात आले  आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news