सातारा : महेंद्र खंदारे
कास पठार आणि महाबळेश्वरच्या काही भागात नाईट जंगल सफारी वन विभागाने सुरू केली आहे. यामुळे जंगलामध्ये गस्त घालण्याबरोबरच स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. परंतु, काही तथाकथित पर्यावरणवाद्यांकडून याला नाहक विरोध केला जात आहे. अशाच प्रकारचा उपक्रम अन्य ठिकाणीही चालतो मग सातारा जिल्ह्यात का नाही? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित करत आक्रमक भूमिका घेतली आहे.
सातारा-कास आणि महाबळेश्वर तालुक्यातील दोन मागार्र्ंवर वन विभागाने नाईट जंगल सफारी सुरू केली आहे. जंगलातील गस्त वाढावी, पर्यटनामध्ये वाढ व्हावी व स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी हा उपक्रम उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी सुरू केला आहे. या उपक्रमामुळे पर्यावरण किंवा वन्यजीवांना कोणतेही नुकसान होणार नसल्याचा दावा वन विभाग करत आहे. काहीअंशी यामध्ये तथ्यदेखील आहे. परंतु, काही तथाकथित पर्यावरणवाद्यांकडून याला नाहक विरोध केला जात आहे.
हा विरोधही ठोस अशा कारणांवर नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कास संयुक्त वनव्यवस्थापन समिती याविरोधात आक्रमक झाली आहे. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये जंगलामध्ये वाढ झाली आहे. त्यातच या भागातील 80 टक्के लोक हे स्थलांतरीत झालेले आहेत. उर्वरित नागरिकांना उपजिवीका करण्यासाठी पर्यटनावरच अवलंबून रहावे लागते. महाबळेश्वरध्येही ज्या मार्गावर नाईट सफारी सुरू केली आहे तेथेही अशीच परिस्थिती आहे.
वन विभागाने जो नाईट सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तो त्या-त्या संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांशी चर्चा करूनच घेतला आहे. हा उपक्रमही संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांकडूनच राबवला जाणार आहे. मुख्यत्वे ज्या सार्वजनिक रस्त्याने इतर वाहने जातात त्याच मार्गावर ही नाईट सफारी होणार आहे. या भागात रात्री 12 वाजेपर्यंत इतर वाहनांची वर्दळ असते. त्यामध्ये वन विभागाची दोन वाहने वाढल्याने काय फरक पडणार आहे? असा सवालच ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
या उपक्रमामुळे संयुक्त वनव्यस्थापन समितीचे उत्पन्न वाढून त्या परिसरातील गावांमधील लोकांना आणखी रोजगार उपलब्ध होतील. सध्याच्या घडीला वन विभागातील कर्मचार्यांची संख्या कमी आहे. यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समिती सदस्यांची मदत घेवून हा उपक्रम राबवला जात आहे. या माध्यमातून वन विभागाला मनुष्यबळ मिळत असल्याने जंगलांवर नाईट वॉच ठेवणेही सोपे जाणार आहे.
कास पठार व परिसरातील दुर्गम असलेल्या गावात जीवन जगणे किती कष्टदायक आहे हे एसीत बसलेल्या व्यक्तिला समजणार नाही. सध्याच्या घडीला कास हंगाम वगळता येथील नागरिकांना दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे नाईट सफारी सुरू केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसेल. परंतु, ज्यांना या भागाची माहितीच नाही, ज्यांनी या भागात दिवस काढले नाहीत, ज्यांनी येथील जगण्याची झळ सोसली नाही अशांकडूनच याला विरोध होत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे हा उपक्रम सुरूच रहावा, यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.
नाईट सफारीमुळे स्थानिकांना रोजगार व जंगलाचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाचा वन्यप्राणी किंवा जंगलाला कोणतेही नुकसान होणार नाही. याउलट पर्यटन वाढ होवून आणखी रोजगार निर्मिती होणार आहे.
– महादेव मोहिते (उपवनसंरक्षक)