सांगली : मुलांचा वाढतोय ‘स्क्रीनटाईम’…मोबाईलच्या व्यसनाने मानसिक आरोग्य धोक्यात

सांगली : मुलांचा वाढतोय ‘स्क्रीनटाईम’…मोबाईलच्या व्यसनाने मानसिक आरोग्य धोक्यात

सांगली;  सचिन लाड :  शाळा सध्या ऑफलाईन सुरू असल्या तरीही काही शाळा विद्यार्थ्यांना व्हॉटसअ‍ॅप ग्रुप व पोर्टलच्या माध्यमातून शिकवणी देत आहेत. काही शाळांकडून ई-मेलवर (वर्कशीट) पाठविला जात आहे. याशिवाय विविध गेम्स् आणि मीडियावरील छोट्या आकाराचे व्हिडीओ तासन्तास मुले पाहत असल्याने त्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. पालकांनी वेळीच लक्ष न दिल्यास मुलांना मोबाईलचे व्यसन लागू शकते.

मुलांना देण्यात येणारा गृहपाठ डायरीत नोंदविला जातो. तथापि काही शाळांकडून पालकांच्या तयार करण्यात आलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मुलांना गृहपाठ पाठविण्यात येतो. काही शाळांनी यावर पर्याय म्हणून शाळेचे पोर्टलच तयार केले आहे. या पोर्टलवर अभ्यास टाकण्यात येतो. तसे आणखी काही शाळा ई-मेलवर वर्कशीट पाठवित आहेत. पालक त्याचे प्रिंटआऊट काढून घेतात. पण सर्वच पालक हा पर्याय स्वीकारत नाहीत. अशा परिस्थितीत मुलांना मोबाईल, लॅपटॉप या साधनांचा वापर करून अभ्यास करावा लागत आहे.
अनेक मुले शाळेत जाताना दप्तरामधून मोबाईल नेत आहेत. शिक्षक नसतात तेंव्हा मोबाईल काढून गेम्स खेळत बसलेले दिसून येतात. शिक्षकांना ते अनेकदा सापडले पण आहेत. समज देऊनही मुलांना मोबाईलचे लागलेले व्यसन कमी होईना झाले आहे.

गेम्स्, छोट्या आकाराच्या व्हिडीओचे वेड

मुले सध्या मोबाईलवर विविध गेम्स खेळताना तासन्तास त्यामध्ये हरवून गेलेली असतात. सोशल मीडियावरील विविध आकाराचे छोटे व्हिडीओ पाहतानाही त्यांना वेळेचे भान उरत नाही. त्यामुळे मुलांचा स्क्रीनटाईम वाढतच चालला आहे. पालकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर ते मुलांवर चिडतात. त्यांच्या हातातून मोबाईल हिसकावनू घेतात. मात्र, त्यानंतरही पुन्हा काही वेळातच मुले मोबाईलमध्ये गुंग होऊन गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

आरोग्यावर होणारे परिणाम…

स्क्रीनटाईममुळे नेत्र विकारांना आमंत्रण. डोळे लाल होणे, चष्म्याचा नंबर वाढतो. डोळ्यांना प्रचंड कोरडेपणा येतो.

स्क्रीनटाईमचे परिणाम…

चिडचिड व एकलकोंडेपणा वाढतो. मुलांना मोबाईलचे व्यसन लागू शकते. संवाद व खेळणे कमी होते.

मुलांचा मोबाईलवर वाढलेला स्क्रीनटाईम कमी करण्यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवेत. त्याच्या अतिवापराचे दुष्परिणाम समजावून सांगावेत. पालकांनी मुलांना वेळ द्यावा.
– डॉ. प्रदीप पाटील, मानसोपचारतज्ज्ञ, सांगली

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news