शेअर बाजार फसवणूक : बगबुल विशाल फटेला 10 दिवस पोलिस कोठडी

शेअर बाजार फसवणूक : बगबुल विशाल फटेला 10 दिवस पोलिस कोठडी

बार्शी ; पुढारी वृत्तसेवा : बार्शीसह संपूर्ण महाराष्ट्रात बहुचर्चित ठरत असलेल्या बार्शीतील बिगुबुल शेअर बाजार फसवणूक प्रकरणातील सूत्रधार विशाल फटे याला आज मंगळवारी बार्शी येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायमूर्ती अजित कुमार भस्मे यांनी त्याला दहा दिवसांची (दि. 27 पर्यंत) पोलिस कोठडी दिली. एकूणच फटेच्या सुरक्षेपासून ते त्याला लपवून फटेला गोपनीय पद्धतीने मागील दाराने न्यायालयात आणण्याच्या प्रकरणाची शहरात उलट-सुलट चर्चा सुरू होती.

विशाल फटे याने शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केल्यास मी जास्त नफा मिळवून देतो, असे म्हणून लोकांना आपल्या जाळ्यात ओढले होते. त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची रक्‍कम गुंतवणूक करून घेऊन ती रक्‍कम परत न देता फसवणूक केली होती. गेल्या 9 जानेवारीपासून तो आऊट ऑफ कव्हरेज झाला होता. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाबरून त्याच्याविरोधात बार्शी शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

एकूण 81 तक्रारदारांनी केलेल्या तक्रारी करून 18 लाख 78 हजार रुपयांची फसवणूक झाल्याबाबत पोलीस ठाण्यामध्ये फटेसह इतर चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास देण्यात आला होता.

पोलिस त्याचा शोध घेत असताना काल दि. 17 रोजी नाट्यमयरित्या फटे याने एक व्हिडिओ तयार करून तो त्याच्या अकाउंटवर टाकून झालेल्या प्रकाराबाबत माहिती दिली होती व जवळच्या पोलिस ठाण्यात हजर होतो, असे सांगितले होते. यानंतर सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फटे हा सोलापूर येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. तसेच त्याला सोलापूर येथे ठेवण्यात आले होते.

मंगळवारी विशाल फाटे याला बार्शी न्यायालयात हजर करण्यात येईल, असे जिल्हा पोलिस प्रमुखांनी सोलापूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. मंगळवारी त्याला बार्शी न्यायालयात आणण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

फटे याला न्यायालयात आणले जाणार का? का व्हीसीच्या आधारे प्रकिया होणार याबाबतची माहिती खूपच गोपनीय पद्धतीने ठेवण्यात आली होती. मात्र, अखेर पाच वाजून 12 मिनिटांनी विशालला सरकारी गाडीतून बार्शी न्यायालयात पाठीमागील दरवाजातून न्यायालयात आणण्यात आले. त्यावेळी त्याच्या समवेत पोलिसांचा मोठा फौजफाटा, पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले होते.

बार्शी न्यायालयात सरकारी वकील अ‍ॅड प्रदीप बोचरे यांनी फटेच्या तिन्ही कंपनीचे मूळ कागदपत्रे हस्तगत करावयाचे आहेत, फिर्यादी व इतर गुंतवणूकदारांनी फटे याच्याकडे गुंतवणुकीसाठी दिलेली रक्कम त्याने कोण कोणत्या कंपनीत अथवा कोणत्या कोणत्या योजनेमध्ये कशा पद्धतीने गुंतवणूक केलेली आहे.

त्याबाबतचा कागदोपत्री पुरावा, इलेक्ट्रॉनिक्स पुरावे मिळवायचे आहेत, दिलेली रक्कम त्याने गुंतवणूक न करता ती रक्कम त्याने स्वतःच्या फायद्यासाठी वापरली असल्यास ती रक्कम इतर कोणाकडे दिली, याचा शोध घेऊन ती रक्कम हस्तगत करावयाची आहे, नातेवाईक किंवा मित्राच्या नावे स्थावर-जंगम मालमत्ता खरेदी केलेली वगैरे आहे काय, रकमेची अन्य प्रकारे विल्हेवाट लावली आहे का, विशाल सह फिर्यादी व साक्षीदार यांची समोरासमोर रुजवात करून अपहारीत केलेली रक्कम त्याने कुठे ठेवली आहे, याचा शोध घेणे, फटेला या गुन्ह्यामध्ये अन्य कोणी कोणी मदत केली आहे, तसेच त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीचे सोलापूर जिल्हा बाहेरील कंपनी कार्यालयाच्या ठिकाणी त्याला सोबत घेऊन जाऊन तपास करावयाचा आहे,

बनावट कागदपत्राच्या आधारे स्थापन केलेले जे एम फायनान्स सर्विसेस कंपनी व त्या कंपनीचे एचडीएफसी पुणे या बँकेतील खात्याबाबत सखोल तपास करून पुरावा हस्तगत करायचा आहे, तसेच अपहरण केलेली रक्कम कोणत्या बँकेत डिपॉझिट केले आहेे याबाबत चौकशी करणे आवश्यक आहे.त्यामुळे फटे याला पोलिस कोठडीची आवश्यकता आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील अ‍ॅड प्रदिप बोचरे यांनी मांडला.

तक्रार दारांची संख्या वाढत असल्यामुळे व इतर अणेक बाबींचा तपास होण्यासाठी फटे याला 14 दिवसाची पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकील अ‍ॅड प्रदिप बोचरे यांनी न्यायालयात केली होती. मात्र न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी मंजुर केली. विशाल फटे याचे वकिल अ‍ॅड विशालदिप जाधव (सांगोला) यांनी तो स्वतः पोलिसात हजर झाला आहे.फसवणूक प्रकरण हा तांत्रिक मुद्दा आहे असा युक्तिवाद केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news