व्यायाम करताना सहा.पोलिस आयुक्‍त भोसले यांचा सोलापुरात मृत्यू

व्यायाम करताना सहा.पोलिस आयुक्‍त भोसले यांचा सोलापुरात मृत्यू

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : सहायक पोलिस आयुक्‍त सुहास शिवाजीराव भोसले (वय 56) यांना जीममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी (दि. 11) सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास ऑफिसर क्‍लब जीममध्ये ही दुर्घटना घडली.

सुहास भोसले हे मूळ पुणे जिल्ह्यातील होते. सन 1988 मध्ये फौजदार म्हणून पोलिस सेवेत रूजू झाले. त्यांनी एमपीए नाशिक येथे 15 जून 1088 ते 1 एप्रिल 1989 पर्यंत पोलिस प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी फौजदार म्हणून मुंबई शहर, पुणे शहर, रत्नागिरी व सोलापूर शहर येथे काम केले. त्यानंतर त्यांना पोलिस निरीक्षक या पदावर पदोन्नती मिळाली.

त्यांनी सोलापूर ग्रामीण (अक्कलकोट), सी. आय. डी. पुणे, पुणे शहर येथे निरीक्षक म्हणून काम केले. त्यानंतर भोसले यांना सहाय्यक पोलिस आयुक्तपदी बढती मिळाल्यानंतर त्यांनी अमरावती शहर व सोलापूर शहर येथे काम केले.

सध्या ते मुख्यालयात सहाय्यक पोलिस आयुक्त (विभाग-1) म्हणून कार्यरत होते. नेहमीप्रमाणे सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास ऑफिसर क्‍लब जीममध्ये व्यायामासाठी गेले होते.

व्यायाम करताना त्यांना चक्कर आली व ते कोसळले. त्यावेळी तेथील प्रशिक्षकाने त्यांना लिंबू पाणी देऊन विश्रांती घेण्याची सूचना केली. दहा मिनिटांच्या विश्रांतीनंतर त्यांना बरे वाटू लागल्याने त्यांनी पुन्हा व्यायाम सुरू केला. त्यावेळी त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आल्याने निपचिप कोसळले.

त्यावेळी प्रशिक्षकासह उपस्थितांनी तत्काळ अश्‍विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. परंतु त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी जाहीर केले. सिव्हिलमध्ये त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी सारीका, मुलगी डॉ. सौरभ व मुलगा सन्मेश असा परिवार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news