विजयदुर्ग : ऐतिहासिक काळातील विजयदुर्ग बंदर सुन्‍न!

विजयदुर्ग : ऐतिहासिक काळातील विजयदुर्ग बंदर सुन्‍न!
Published on
Updated on

विजयदुर्ग : सचिन लळीत
एकेकाळी मोठे व्यापारी बंदर म्हणून विजयदुर्ग बंदराचा नावलौकिक होता. विजयदुर्ग येथून वाघोटण खाडीतून खारेपाटणपर्यंत होणारी माल वाहतूक तेथून कोल्हापूर, फोंडा भागात माल जात होता. पश्‍चिम महाराष्ट्राला अतिशय जवळचे असणारे हे बंदर त्याकाळी व्यापार, उद्योगामुळे भरभराटीला होते. बंदरातून होणारी व्यापारी उलाढाल तसेच प्रवासी बोटीमुळे मोठ्या प्रमाणात असलेली प्रवाशांची वर्दळ व आंबा हंगामात बोटीतून मुंबईला पार्सल पाठवण्यासाठी असणारी व्यापारांची गर्दी यामुळे हे बंदर कायम गजबजलेले होते. परंतु काळ बदलला आणि येथील जलवाहतूक बंद झाली. यामुळे येथील व्यापारदेखील कमी झाला आणि विजयदुर्ग बंदराचे सुगीचे दिवस लुप्त पावले. सध्या हे बंदर सर्वच गोष्टी ठप्प झाल्यामुळे सुन्न पडले आहे.

विजयदुर्ग बंदरात समुद्र किनार्‍यापासून चार मीटरची खोली आहे, तर दीड कि.मी. परिघात अठरा मीटरची खोली आहे. त्यामुळे जेएनपीटी आणि मुंबई पोर्ट यांच्याप्रमाणे विजयदुर्ग बंदराची भौगोलिक परिस्थिती सक्षम आहे. यामुळे हे बंदर विकसित झाले तर पूर्ण महाराष्ट्राच्या विकासाला याचा फायदा होऊ शकेल. आज गुजरातसारख्या राज्यात असेलेली बंदरे चांगल्या प्रकारे विकसित केली गेली असल्याने मोठ्या प्रमाणात त्या राज्याच्या विकासाला गती मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारने देखील कोणातील बंदराचा विकास करून राज्याला देखील अग्रेसर बनवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विजयदुर्ग बंदराला आंतराष्ट्रीय दर्जाचं बंदर होण्यासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दर्शवला होता. यामुळे या बंदराचा विकास होईल असे स्वप्न येथील तरूणांच्या मनात होते. परंतु अद्याप विकास सोडा तर बंदर अधोगतीकडे जात आहे, अशी परिस्थिती आहे.

कोकणातील हे बंदर गेले कित्येक वर्ष विकासाचे स्पप्न पाहत आहे. परंतु विकास शून्य अशीच परिस्थिती सध्या आहे. यापूर्वी येथे भारतीय शिपयार्डसारखा उद्योग सुरू होणार होता; परंतु तोदेखील सुरू झाला नाही.काही वर्ष येथून मळी निर्यात होत होती; परंतु तोही उद्योग जयगड येथे गेल्याने येथील असलेले रोजगार बंद पडले. यामुळे ऐतिहासिक काळातील हे बंदर आज मात्र उदासीन स्थितीत आहे.विजयदुर्ग बंदर आंतराष्ट्रीय बंदर म्हणून उदयास आले तर दक्षिण भागातील राज्यांकडे जाणारे धान्य, खत, गॅस आदींची वाहतूक सुरू होईल.तसेच हे बंदर वैभववाडी-विजयदुर्ग असे रेल्वेने जोडले गेले तर येथील व्यापार उद्योगाला मोठी चालना मिळू शकेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news