

बाबा, संध्याकाळी आम्ही चौघं मित्र काजवे पाहायला जाणार आहोत.
कसे?
ऑफकोर्स चारचाकी घेऊन.
बापरे!
त्यात काय एवढं? चौघं जाऊ, बाहेर जेऊ, घाट ओलांडून एका स्पॉटवर पहाटेपर्यंत थांबू. मस्त काजवेबिजवे बघू. उजाडलं की, भराभर घरी येऊन नोकर्यांवर जाऊ.
म्हणजे सकाळी तू घरी सुखरूप आलेला दिसलास की, मी सुटलो. नाहीतर मला घरबसल्या डोळ्यांसमोर तारे चमकताना दिसणार.
का? आम्ही कुकुली बाळं आहोत? आमचं ड्रायव्हिंग वाईट आहे?
नाही रे! पण, आपले रस्ते वाईट आहेत. रस्त्यावरच्या अपघातांचं रेकॉर्ड तर फारच वाईट आहे. भारतीय रस्ते 2020 हा लेटेस्ट अहवाल बाहेर आलाय रे! रस्ते अपघातात महाराष्ट्र देशात दुसर्या क्रमांकावर आहे.
चला, कशात तरी आपण पहिल्या दुसर्या नंबरावर आहोत म्हणायचे!
अरे, लाज वाटायला हवी. साधा रस्ता नीट, सुखरूपपणे पार करता येत नसेल तर!
रस्ते धड आहेत आपल्याकडले?
तो वेगळा मुद्दा; पण त्यामुळे तुमचं नियम मोडणं काही समर्थनीय ठरत नाही.
तुम्हाला तरुणांच्याच चुका नेहमी आधी दिसतात बाबा!
स्कूटरवर बसताना हेल्मेट घालता?
घालतो. म्हणजे, कधीकधी, शक्यतो, जमल्यास.
का? ते न जमल्यास कधीकधी अपघातात जीव जाऊ द्यायचे?
आम्ही आजकाल कारच जास्त वापरतो.
ठीक आहे. मग, सीट बेल्ट लावता? दारू न पिता, सिग्नल न मोडता गाड्या पळवता?
रोज कार चालवताना दारू पिणं शक्य तरी आहे का बाबा?
म्हणजे शक्य असतं, तर केलं असतं का? पोलिसांनी पकडलं तर नीट रितसर दंड भरता का हळूच नोटा सरकवता इकडून तिकडे?
आम्ही ढीग सरकवू. ते का घेतात?
पुन्हा आपण समोरच्यावर घसरतोय. आधी आपली पाटी तर तपासा चिरंजीव. फोनवर गप्पा मारत गाडी किती जणं चालवता? वेगमर्यादा धाब्यावर कोणकोण बसवता?
आता रस्ता मोकळा मिळाला की, गाडी पळवावीशी वाटणारच ना बाबा! काय साली जिंदगानी आहे? एकेक भुंगाट पळणार्या गाड्या हातात आहेत; पण चाकाखाली धड रस्ते नाहीत. आमच्या एका दोस्ताने तर त्याच्या इंपोर्टेड गाडीला असली डिझायनर नंबरप्लेट बसवली आहे ना बाबा?
हा अजून एक वांधा.
त्याला परवडतंय, तो घेतोय, तर वांधा कसला बाबा?
अरे त्या फॅन्सी, चित्रविचित्र नंबर प्लेटस् पोलिसांकडच्या इलेक्ट्रॉनिक रिडर्सना वाचता येत नाहीत. मग, त्यांची दंडाची चलनं नीट निघत नाहीत.
असं पण असतं वाटतं?
तेच तर सांगतोय. अशा खूप गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे रस्ते अपघात वाढत चाललेत किंवा आपण अॅक्सिडेंट केला तरी बेमालूम सुटू अशी भावना वाढत चाललीये काही लोकांमध्ये.
मग काय घरी, पेटीत सुरक्षित बसून राहायचं माणसानं?
तसंच नाही अगदी; पण निदान कायदे, नियम मोडून वाहनं पळवणं पुरे करावं. रस्त्याचा मामला एवढा सस्त्यात घेऊ नये म्हणजे मिळवली!