रत्नागिरी : ‘त्यांचे’ पुसलेले कुंकू ग्रामपंचायतीने लावले परत!

रत्नागिरी : ‘त्यांचे’ पुसलेले कुंकू ग्रामपंचायतीने लावले परत!

दापोली : प्रवीण शिंदे
विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव दमामे- तामोंड ग्रा. पं. ने नुसता कागदावर राबविला नाही तर वटपौर्णिमा या दिवशी ग्रामपंचयतीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या कार्यक्रमात विधवा महिलांना सुहाससिनीनी कुंकू लावले. ज्या समाज रुढीने महिलांचे कुंकू पुसलेले होते ते ग्रामपंचायतीने त्यांना परत केले आहे. यावेळी कुंकू लावताना विधवा महिला भावूक झाल्या.

या उपक्रमातून दमामे- तामोंड ग्रामपंचायतीचा आदर्श घ्यावा तेवढा थोडा असे काम ग्रा. पं.च्या या अभिनव उपक्रमातून दिसून आले. या वेळी विधवा महिलांना पैठणी देखील भेट देण्यात आल्या. दि. 14 रोजी दमामे- तामोंड ग्रा. पं.ने वटपौर्णिमा सणाचे औचित्य साधून या विधवा महिलांचा सन्मान केला आहे. विधवा प्रथा बंद करणारी दमामे- तामोंड ही ग्रामपंचायत रत्नागिरी जिल्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. ही प्रथा बंद करून शासनाकडून काही तरी बक्षीस मिळेल, या लालसेने ही प्रथा गावाने बंद केली नसून विधवांना चारचौघात सन्मानाने वावरता येईल यासाठी गावाने पुढाकार घेतला आहे, असे येथील सरपंच गंगाराम हरावडे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजन सरपंच गंगाराम हरावडे, उपसरपंच अर्पिता शिगवण, ग्रा. पं. सदस्य नरेश धनावडे,शरद विठमल, रुपाली हरावडे, स्वप्नाली खेडेकर, प्रकाश हरावडे, प्रणाली सावंत ग्रामसेवक नामदेव जाधव यांनी केले होते. या वेळी विधवा महिलांना बळीराजा शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष गणेश देवघरकर आणि सौ प्रिया गणेश देवघरकर यांनी पैठणी भेट दिल्या. या कार्यक्रमासाठी भडवले गावचे सरपंच विजय नाचरे, उन्हवरे माजी सरपंच मंगेश शिंदे, पत्रकार प्रशांत कांबळे, कीर्तनकार प्रकाश भेकरे, अविनाश लोखंडे, तंटामुक्ती अध्यक्ष सिद्धार्थ सावंत आदी उपस्थित होते.

विधवा प्रथा बंद केल्यानंतर विधवा महिला आता पुढे येऊ लागल्या आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय सार्थकी लागला याचा सार्थ अभिमान आहे.
– गंगाराम हरावडे
सरपंच ,दमामेे- तामोंड.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news