खेड शहर; पुढारी वृत्तसेवा: खेड येथील जगबुडी नदीतील गाळ न काढल्यामुळे या वर्षी शहरात पुराचे पाणी शिरण्याची शक्यता नागरिक आणि व्यापारीवर्गाला वाटत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिका-यांनी प्रांताधिका-यांना याबाबत निवेदन देऊनही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे १ जून रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते जगबुडीनदीतील पाण्यात उतरून आंदोलन करणार आहेत.
माजी आमदार संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे आंदोलन गुरूवारी १ जून रोजी सकाळी ९ वाजता केले जाणार आहे. अनेक कार्यकर्ते यामध्ये भाग घेणार आहेत. हा विषय नागरिकांच्या हिताचा असल्याने विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, नागरिक आणि व्यापा-यांनी आंदोलनात सक्रीय भाग घ्यावा असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खेड शहरप्रमुख दर्शन महाजन यांनी केले आहे.
याबाबत बोलताना महाजन म्हणाले, नदीतील गाळ न काढल्याने लोकांच्या मनात पुराची भीती निर्माण झाली आहे. इतर ठिकाणी जिल्ह्यामधील शहरातील नद्यांचे गाळ काढण्याचे काम सुरू आहे, मात्र खेडमध्ये विविध कारणे दिली जात आहेत. सदर गाळ काढणे यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र अद्याप गाळ काढण्यास सुरुवात झालेली नाही तसेच गाळ काढण्याची परवानगी अद्याप प्रशासनाकडून , सरकारकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनासह सत्ताधा-यांना जाग यावी म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडू आंदोलन करण्यात येणार आहे.
या नदीतील गाळ काढण्यासाठी राज्य शासनाने ५० लाख रुपये मंजूर केले होते. पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत या बाबत एक बैठक झाली होती. यावेळी खेड शहर व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आमदार योगेश कदमही उपस्थित होते. गाळ न काढल्याने मंजूर झालेले ५० लाख रुपये अन्यत्र वळविण्यात आले आहेत. राज्य सरकार नदीतील गाळ काढण्याची परवानगी देत नाही. सीआरझेड चा अडथळा येत असल्याचे कारण खेडच्या प्रांत कार्यालयातून देण्यात आले आहे. त्यामुळे खेडचे व्यापारी नाराज आहेत. आमदार योगेश कदम याबाबत काय बोलतात याकडे खेड वासियांचे लक्ष लागले आहे.
गोविंद राठोड,खेड