मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज होणार महापूजा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज होणार महापूजा

पंढरपूर ; पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीच्या मुख्य सोहळ्यानिमित्त मंगळवारी (दि. 20) पहाटे 2.20 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा होत आहे. त्यासाठी सोमवारी उद्धव ठाकरे स्वतः आपली गाडी चालवत सायंकाळी कुटुंबासह पंढरपुरात दाखल झाले.

दरम्यान, त्यांच्यासमवेत शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळालेले मानाचे वारकरी वर्ध्यातील केशव शिवदास कोलते (वय 71) व इंदुबाई केशव कोलते (वय 66) हे दाम्पत्य सहभागी होत आहे.

आषाढी एकादशी सोहळ्यातील या महापूजेसाठी मंदिर समिती आणि प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.

आषाढी सोहळ्याच्या परंपरेनुसार श्री. ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक पहाटे 2.20 वाजता महापूजा व अभिषेक होणार आहे. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील सपत्नीक पूजेला उपस्थित राहणार आहेत.

पहाटे महापूजा झाल्यानंतर मंदिर समितीने तयार केलेल्या विठुरायाच्या नवीन प्रतिमांचे अनावरण करण्यात येईल. यानंतर कान्होपात्रेचे वृक्ष (तरटी झाड) मुख्यमंत्री ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लावण्यात येणार आहे.

पूजेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पत्नी रश्मी ठाकरे यांचा सत्कार श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सभामंडपात करण्यात येईल. तर मानाचे वारकरी केशव कोलते यांचा सत्कार मुख्यमंत्री करतील.

यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मार्गदर्शनानंतर मंदिरातील कार्यक्रम संपेल. आषाढी यात्रेनिमित्त फुलांची आरास संपूर्ण मंदिराला करण्यात आली असून आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आलेली आहे.

यावेळी ठाकरे हे देशावरील कोरोनाचे संकट टळून महाराष्ट्राला सुख-समृद्ध कर, असे विठुरायाला साकडे घालणार असल्याचे सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news