बेळगाव : दोन गटांत हाणामारी, पाठलागचा थरार ; 1 ठार

बेळगाव : दोन गटांत हाणामारी, पाठलागचा थरार ; 1 ठार

Published on

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
क्षुल्लक कारणातून व ओळखीचे असलेले दोन गट एकमेकांशी भिडले. एका गटातील तरुणांनी दारू प्यायली असल्याने शाब्दिक वाद हाणामारीवर आला. त्यात चाकूने सपासप वार झाल्याने एक तरुण ठार झाला, तर दोन्ही गटांतील आठजण जखमी झाले. तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित जखमी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. मुदकाप्पा चंद्राप्पा अंगडी (वय 25, रा. सुनकुप्पी, ता. बैलहोंगल) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

हाणामारीत दोन्हीकडील आठजण जखमी झाले आहेत. रमेश बी. चंदरगी (20), सुनील अरबळ्ळी (25) व विशाल बागडी (18), भरमोजी अरबळ्ळी (22), लक्‍काप्पा हळ्ळी (20) व संजू अरबळ्ळी (20, सर्व जण रा. करडीगुद्दी, ता. बेळगाव) अशी जखमींची नावे आहेत. दुसर्‍या गटातील नागराज व अन्य एक तरुणही जखमी आहे. बोलेरो वाहनाचेही नुकसान झाले असून पोलिसांनी ते जप्त केले आहे. मारीहाळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुदकाप्पा चंदरगी व त्याच्यासोबत असलेले अन्य सात तरुण बेळगावला न्यायलयीन खटल्याच्या सुनावणीसाठी आले होते. बोलेरोमधून ते गावी परतत जात होते. यावेळी मारीहाळ रोडवरील महालक्ष्मी ढाब्याजवळ मुदकाप्पाच्या ओळखीचा नागराज व अन्य काही तरुण थांबले होते. मुदकाप्पाने नागराजला हात केला, त्यानेही हात केला आणि बोलेरो थांबली.

शाब्दिक चकमकीनंतर पाठलाग

मुदकाप्पासोबत 8 जण होते. तर ढाब्याजवळ थांबलेले चौघेजण होते. दोन्ही गट जवळ आल्यानंतर त्यांच्यात वादावादी सुरू झाली. त्यानंतर आठजण पुन्हा बोलेरोमधून पुढे जाऊ लागले. त्यावेळी दुसर्‍या गटातील चौघांनी आणखी चौघांना बोलावून घेऊन बोलेरोचा पल्स्र् व अन्य दुचाकींवरून पाठलाग केला. बोलेरो कॅम्पबेल परिसरातील पुलाजवळील उतरतीला आल्यानंतर दुसर्‍या टोळीने आपल्या दुचाकी बोलेरोच्या आडव्या आणत बोलेरोचा चालकाच्या बाजूचा आरसा फोडला. त्यानंतर बोलेरो थांबताच समोरच्या व बाजूच्या काचांवर स्टंप व रॉडने हल्ला चढवत काचा फोडल्या.

त्यामुळे चिडलेला बोलेरोमधील गटही खाली उतरला. त्यांच्या वाहनातही मागे विळा व अन्य धारदार शस्त्रे होती. त्याद्वारे त्यांनीही पलटवार करत दुसर्‍या गटातील आठ जणांवर तुटून पडले. या धुमश्‍चक्रीत मुदकाप्पाच्या डोकीत, छातीवर, हातावर व गळ्यावर वर्मी घाव बसल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला रूग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. या हाणामारीत आणखी तिघांवरही गंभीर वार झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

घटनेची माहिती मिळताच कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रविंद्र गडादी यांनी घटनास्थळी भेट दिली. तत्पूर्वी ग्रामीणचे एसीपी गणपत गुडाजी, मारीहाळचे निरीक्षक महांतेश बसापुरी व त्यांच्या सहकार्‍यांनी पंचनामा केला. दोन्ही गटातील अनेक तरुण जखमी आहेत. किरकोळ जखमी असलेल्या काहींनी पलायन केले आहे. त्यामुळे कोणत्या गटातील नेमका कोण? हे रात्री उशिरापर्यंत पोलिसांनाही स्पष्ट झालेले नव्हते. त्यामुळे एफआआरमध्ये नेमक्या व्यक्तींची नावे आलेली नव्हती. तरीही पोलिसांनी नागराज, अरबळ्ळी व त्याच्या समवेत असलेल्या गटावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर मृत मुदकाप्पाच्या गटातील तरुणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा मारीहाळ पोलिसांत दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक महांतेश बसापुरे तपास करीत आहेत.

 हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news